Monday, October 29, 2012

सामर्थ्यवान रडणं.


नुकतचं मागे एक नाटक पाहिलं. नाटकाचा मूळ गाभा हा मनुष्याचे मनुष्यपण हरवतंय की काय अशी शंका उत्पन्न करणारा होता. आणि नाटकाच्या शेवटी अगदी सहज मनात प्रश्न निर्माण झाला की खरंच आपण शेवटचे रडलो कधी?

रडणं हे आपल्या समाजामध्ये कमकुवतपणाचं लक्षण मानलं जातं. खरं तर हसण्यापेक्षाही 'रडणं' हीच माणसाची अधिक जवळची भावना होय. जन्मल्यावर लगेचच मनुष्य रडतोच. माणूस जसा दु:खात रडतो तसाच तसाच तो अत्यानंदामध्येसुद्धा रडतो. खूप जवळची व्यक्ती बऱ्याच दिवसांनी भेटल्यावर डोळ्यात अश्रूच येतात की ! 

मला वाटतं की प्रत्येकाने भरपूर रडावं. अगदी मन:पूर्वक रडावं. कारण रडणारा नेहमीच कमकुवत असतो असं मुळीच नाही. रडणं संवेदनशीलतेशी नातं सांगणारं सगळ्यात प्रभावी माध्यम. आणि केवळ कमकुवतपणाच्या आरोपाला घाबरून जाऊन ही भावना का दाबावी? माणसाच्या कोणत्याही कृतीपेक्षा रडण्याने सर्वाधिक भार हलका होतो असं एका सर्वेक्षणाने सिद्धसुद्धा केलंय. 

आणि डोळ्यात पाणी आलं म्हणजेच रडणं असं कोण म्हणत? बुद्धाची अखिल मानवजातीसाठी असणारी अपार करुणा हेपण रडणंचं नव्हे का? ज्ञानेश्वरांची पसायदानातील मागणी हेपण मला त्यांच्या अपरंपार संवेदनशीलतेचं प्रतिक वाटतं.  मदर तेरेसा, बाबा आमटे अशा लोकांच्या कामातून हेच प्रतीत होतं. हे असे कितीतरी लोक स्वत:ला 'रड्या' म्हणवून घेत असत. व्यक्तीप्रती, समाजाप्रती त्यांना असणाऱ्या अपार श्रद्धेचंचं हे प्रतिक असावं.


No comments:

Post a Comment