Showing posts with label grace (ग्रेस). Show all posts
Showing posts with label grace (ग्रेस). Show all posts

Wednesday, April 9, 2014

साजणवेळेचा निर्मिक : ग्रेस - ५


आपल्या पुरातन,प्राचीन साउल धर्माशी कायम एकनिष्ठ राहिलेल्या ग्रेसने आणि त्यांच्या कवितेने कधीच कोणाचे मिंधेपण स्वीकारले नाही की पुरस्कार,मानमरातब यांची तमा बाळगली नाही.अधिमान्यतेची असूया बाळगली नाही.When you have finished with others..That is my time.  हे ग्रेस चे वाक्य त्यांना मिळालेल्या पुरस्काराच्या आणि त्यांच्या वेळेच्या बाबतीत तंतोतंत लागू पडले.त्यामुळेच ‘विदर्भ भूषण’ पुरस्कार स्वीकारताना “आता या पैशांचं मी काय करू? थोडे आधी मिळाले असते तर मी शाम्पेन आणि सिगरेट तरी प्यायलो असतो आणि विदर्भ भूषण दिलात म्हणून तुम्ही चिंता करू नका,मी आताच स्पष्ट करतो की मी ‘महाराष्ट्र भूषण’ च्या शर्यतीत नाही.” असे ते थेट मुख्यमंत्र्यांना बोलू शकले.’साहित्य अकादमी’ पण त्यांनी गाजावाजा न करता  स्वीकारला तो “The politeness of my poetry is always behind the curtain..But it is always above the door” या   नेमस्त पणामुळेच.

माणूस असो की देव,त्यांना कधीना कधी दुःख,वेदना यांच्याशी सामना करावा लागतो त्यामुळे या दुःखाची जाणीव अत्यंत प्राथमिक अवस्थेत करून देणे इष्ट ठरते.या जाणीवेची व्यवस्था ग्रेस ने आपल्या ‘निरोप’ या कवितेतून खालील प्रमाणे केलेली आहे
                    “मी खरेच दूर निघालो..तू येऊ नको ना मागे
                     तळातावरचा फोड फुटणार..अशा अनुरागे
                     वेदनेला नसते वीण..पडछाया तुडवीत जाणे
                   अंगाईत मुलांना तू सांग इतकेच गाणे”

 वेदना,कारुण्य,दुःख यांनी ग्रेस ची कविता समग्र व्यापलेली आहे हे दु:ख व्यक्त करण्यासाठी,वेदनेचा आकांत करण्यासाठी प्रतिमांचा वापर केल्यामुळे दुर्बोधता हे ग्रेस च्या कवितेचे अटळ प्राक्तन ठरते.ग्रेस ची कविता उमजण्या साठी नाही तर अनुभवण्यासाठी साठी आहे हे ज्यांना समजले ते ग्रेस च्या कवितेत वितळले आणि एकरूप झाले आणि समृद्ध झाले.
  
२६ मार्च २०१२ रोजी ग्रेस चे कार्कारोगाबरोबरचे युद्ध त्यांचे ‘रक्तगंधाचे दिवे’ मालावूनच संपले.
                    “माझ्या कुळाप्रमाणे..मृत्यू मला दुपारी
                    आईस दर्पणातून..बोलावतात घारी”
असे लिहिणाऱ्या ग्रेस ला मृत्यू मात्र सकाळी आला.ग्रेस गेले आणि साहित्य विश्वात एक पोकळी निर्माण झाली.
                     “घरभर सारणाचे पात्र सांडून जाई..
                     फिरुनी माझा पुन्हा निर्वंश होई”
असे ‘ओल्या वेळूच्या बासरी’ तून प्रतिपादन करताना ग्रेस ने आपला वारसदार सोडाच पण उत्तराधिकारी देखील कोणी नाही हे कदाचित सूचित केलेले आहे.त्यामुळे ही पोकळी भरून येणे खूप अवघड आहे.

परंतू आपल्याला जे समृद्ध केलेले आहे त्याची कृतज्ञता आज ग्रेस नाहीत तरी किंवा ग्रेस नाहीत म्हणूनच आग्रहीपणे व्यक्त केली पाहिजे..आणि त्यासाठी ग्रेस ने माझ्या झोळीत टाकलेल्या शब्दांचाच आधार घेणे क्रमप्राप्त आहे...

            “आभाळातून गळते माती...वारा उदास भटके
             तू गेल्यावर साजणवेळी...शब्द झाले पोरके..”

चंद्रमाधवीच्या प्रदेशाचा शेवट करताना ग्रेस ने रविंद्रनाथ टागोरांचे एक वाक्य उधृत केलेले आहे
And when my voice is silent in death, my song will speak in your living heart.

  हे भा.रा.तांब्यांच्या “मी जाता राहील काय..जन पळभर म्हणतील हाय हाय” या विदग्ध सत्यापेक्षा निश्चित आशादायी आहे.

हा आशावाद ग्रेस ने देखील केव्हाच व्यक्त केला आहे
                  “ते झरे चंद्रसजणांचे..ही धरती भगवी माया
                  झाडांशी निजलो आपण..झाडांत पुन्हा उगवाया”
ग्रेस कुठेतरी उगवले असतील आणि ‘रहस्य शरणाची दैवी लिपी’ पुन्हा घेऊन येतील हा आशावाद आपण बाळगण्यास काय हरकत आहे ?  

 मकरंद.गजानन.दीक्षित


Monday, April 7, 2014

साजणवेळेचा निर्मिक : ग्रेस - ४


ग्रेस यांच्या साहित्यिक,तात्विक योगदानाचे वैशिष्ट्य म्हणजे ते केवळ निर्मिती करून थांबले नाहीत तर त्या निर्मिती प्रक्रियेचा,त्या निर्मिती आधी निर्माण होणाऱ्या मानसिक आंदोलनांचा त्यांनी डोळस वेध घेतला.’मितवाअसोचर्चबेलअसो वा अगदी शेवटचेओल्या वेळूची बासरीअसो हे ललितलेख संग्रह या निर्मिती प्रक्रियेच्या वेधाचे आविष्कार आहेत आणि त्या साठी ग्रेस ने पौराणिककथा,जातककथा,दंतकथांचा आधार घेतला.त्यामुळेच ग्रेस यांच्या कवितेत द्रौपदी,कुंती,उर्मिला,गांधारी ही पौराणिक पात्रे येतात त्याच बरोबर घोडा,सांड,कावळा,हंस,गरुड सुद्धा प्रतीमारुपाने येतात.ग्रेस यांची कविता द्वैती आहे.त्यांचे महाभारताचे किंवा इतर पुराण कथांचे आकलन आणि निष्कर्ष प्रवाहास छेद देणारे आहेत.त्यामुळेच ग्रेस
              “गांधारी आंधळी का? याचा विषाद नाही..
              धृतराष्ट्र आंधळा का..? हा प्रश्न जीव घेई
असा विषाद व्यक्त करतात आणि काही प्रश्न उपस्थित करतात आणि असे करत असताना त्यांनी कविता म्हणजे काय याचे चिंतनकावळे उडाले स्वामीमध्ये केलेले आहे.If your reciprocation ceases to the world,you go back to your basic internal journey again and again.To this act some one had said poetry.

 ग्रेस यांच्यावर कोणाचाही प्रभाव नव्हता.पण आरती प्रभू बद्दल त्यांना आत्मीयता होती. जी. बरोबर जुळलेले त्यांचे मैत्र सर्वश्रुत आहे.स्वभाव,लेखनशैली आणि अगदी मृत्यूस कारण ठरलेला कर्करोग असो जी. आणि ग्रेस मधले हे समान धागे होते.हे सजातीय धृव पत्रातून एकमेकांना भेटले पण त्यांनी प्रत्यक्ष भेटणे टाळले.ग्रेस ना याचे कारण विचारले असता ते उसळून म्हटलेआमच्या अमूर्त भेटीला मूर्त स्वरूप दिले असते तर आम्ही दोघेही कोसळून,उन्मळून पडलो असतो”.माझ्या निर्मितीचे केंद्र माझा master आणि माझ्या आईकडे आहे असे ग्रेस चे सांगणे होते.

संध्याकाळ ही कायम ग्रेस ची निर्मिती वेळ राहिली.संध्याकाळ,कातरवेळ,सांजवेळ हे तिन्ही शब्द सूर्यास्ताच्या आणि चंद्रोदयाच्या मधल्या काळाचे सुचन करतात..पण त्यातल्या अर्थामध्ये सूक्ष्म भिन्नता आहे.ही भिन्नता ग्रेसच्या कवितेमध्ये ठळकपणे जाणवते.या तिन्ही शब्दांच्या अर्थाचा समुच्चय करून ग्रेस नेसाजणवेळया अनोख्या शब्दाचा उपयोग केलेला आहे.

 अनेक प्रथितयश संगीतकारांना ग्रेस च्या शब्दांनी मोहिनी घातली.एकाच वेळी पराकोटीची टीका आणि वाचक,रसिकांचे उत्कट प्रेम वाटयाला आलेला ग्रेस सारखाकलाकारक्वचितच सापडेल.समकालीन कवींना निसर्गकवी,प्रेमकवी,सामाजिक कवी अशी बिरुदे मिळत असताना ग्रेस च्या माथ्यावर मात्र दुर्बोधतेचा शिक्का बसला. I want to see my cradle and grave..both hanging म्हणणाऱ्या ग्रेस ने देखील तो शिक्का पुसण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला नाही.

टीकेमुळे असो वा स्वभावामुळे ग्रेस चे लोकांत मिसळणे मात्र कमी कमी होत गेले.पण ग्रेस वर मनापासून प्रेम करणाऱ्या वाचकांनीआंधळ्या वाटेवरूनत्यांचा माग काढलाच.कदाचित हेच त्यांनीफुंकरया कवितेच्या एका कडव्यातून (निवडुंग चित्रपटातीलघर थकलेले संन्यासीया गाण्यातून) सूचित केलेले असावे.
                   “मी भिवून अंधाराला..अडगळीत लपुनी जाई
                    ये हलके हलके मागे..या दरीतली वनराई
यातील अंधार ही प्रतिमा टीकेसाठी आणि वनराई ही प्रतिमा वाचकांच्या टवटवीत हिरव्या प्रेमासाठी असू शकेल.

ग्रेस ना हा अर्थ अभिप्रेत नसेल देखील..पणकवितेच्या अर्थावर माझा अधिकार नाहीअसे ग्रेस ने नेहमीच सांगितले आहे.ग्रेस च्या कवितेचा प्रत्येक वेळी वेगळा अर्थ लागतो आणि ग्रेस च्या मनातील आंदोलन आणि वाचकाच्या मनातील आंदोलन यामध्ये ती एका विशिष्ट क्षणी सेतू निर्माण करते.हेच ग्रेस ची कवितासमजलीनाही तरीआपलीवाटण्याचे कारण असावे.जी.एं च्या पत्रवेळेतील एका उल्लेखाप्रमाणे ज्या कवितेमुळे कायिक संवेदना उदा.अंगावर रोमांच येणे,स्तब्ध वाटणे,डोळ्यात पाणी येणे निर्माण होतात ती कविता सर्वश्रेष असते.या निकषानुसार ग्रेस हे अभिजात आणि त्यांच्याच भाषेत प्राचीन कवी होते हे मान्य करावे लागते.
                                                                                                                                      मकरंद.गजानन.दीक्षित