Showing posts with label संगीत. Show all posts
Showing posts with label संगीत. Show all posts

Monday, October 22, 2018

डूबो तो डूबो इतना सुकून से...


                
कालच उस्ताद शुजात हुसेन खांना ऐकायचा योग आला. याहीआधी बऱ्याचदा त्यांना मी ऐकत आलो होतो मात्र live काल प्रथमच ऐकलं. त्यांचं वादन आणि सादरीकरण अर्थातच अत्यंत आनंददायक आणि स्वर्गीय होतं. त्यांच्या वादनाचं समीक्षण करणं हा माझा उद्देश नाही आणि ती माझी पात्रताही नाही.

हा लेख लिहिण्याचा उद्देश जरासा वेगळा आहे. शुजातांच्या हातात सितार पाहणं हाच मला एक उत्सव वाटतो. ते ज्या प्रेमाने, एखाद्या लहान मुलाच्या निरागसतेने, जिज्ञासेने सितार हाताळतात ते बघणं हे खुपच आनंददायक वाटलं. शिवाय त्यांचा संगीताकडे असणारा दृष्टीकोन, attitude सुद्धा भावाला. मैफिलीचा शेवट त्यांनी लाजो लाजो, पत्ता बोला वृक्ष से आणि अशाच काही चीजांनी केला.

एखाद्या संगीतकाराला laptop, CDs च्या माध्यमातून ऐकणं 
आणि त्यालाlive  ऐकणं यामध्ये बराच फरक आहे. ऐकतांना 
त्या व्यक्तीच्या चैतन्याचा स्पर्श, जिवंतपणाचा ओलावा 
संगीतामध्ये ओतला जातो. आणि याचा प्रत्यय काल आला. 
उस्ताद शुजात हा आत्यंतिक मोठ्या दिलाचा आणि उमद्या स्वभावाचा संगीतकार आहे असं मी मानतो.

Sunday, February 12, 2012

संगीत : एक स्वर्गीय आनंद.

संगीत म्हणजे आत्म्याचा शोध, आपल्यातल्या अमूर्ताचा शोध असं अनेकदा ऐकलं आणि वाचलं होतं. परंतु  त्याचा प्रत्यक्ष म्हणावा तसा मनस्वी अनुभव आजवर आला नव्हता.

मात्र नुकताच तसा दैवी अनुभव आला. नेहमीप्रमाणे सकाळी ध्यानधारणा करून मी सकाळी शास्त्रीय संगीत ऐकत बसलो होतो. शास्त्रीय संगीत ऐकणं हा सदैव आनंददायी अनुभव असतो. मात्र हा योग काहीतरी विलक्षण होता. चंद्रकंस कानात घुमत होता. त्यातल्या स्वरांनी वातावरण अगदीच हलकं झाल्यासारखं जाणवत होतं. चैतन्याचे अखंड झरे वाहायला लागले होते. राग हळूहळू फुलत होता, खुलत होता. स्वर पुढे जात होते.

मात्र तरीसुद्धा अजूनदेखील वातावरणात ते सूर तरंगत असल्यासारखे जाणवत होते. हे सारे स्वर एकत्र येवून काहीतरी अमूर्त घडवत होते. खरं म्हणजे अमूर्त घडवावं लागत नाही, ते आपोआपच घडत होतं. समोर काहीतरी विलक्षण, प्रचंड चैतन्यदायी निर्माण होतंय याची जाणीव सातत्याने झाली. अशी जाणीव होण्याच्यासुद्धा पलीकडे जायची तीव्र इच्छा मनात होती. आणि काही क्षण असे आलेत की त्यात जे झालं ते शब्दांच्या पलीकडे होतं. स्वत:च्याच खूप खूप आत तेव्हा मी होतो. तेव्हा नेमकं काय झालं ते सांगता येन कठीण आहे आणि ते सांगण्याची इच्छा सुद्धा नाही. ते तसंच शब्दातीत असू देत.

संगीत मनावर सातत्याने चैतन्याचे घाव घालून त्याच्यावरचं मळभ दूर करतं, जेणेकरून आतमध्ये पोहचणं अधिक सुलभ आणि सुखकर होवून जातं.

संगीतातला मी काही फार मोठा जाणकार नाही. संगीत ऐकतांना जे काही अनुभव येतात त्यांचे अर्थ नेमके काय हेसुद्धा खरंतर नाही सांगता येत. परंतु जे काही अनुभव येतात ते आत्यंतिक आनंददायी असतात हे मात्र खात्रीशीर!!




Sunday, July 31, 2011

संगीत...!!!


नुकतचं संगीत आणि विशेष करून शास्त्रीय संगीत, त्याची सद्यस्थिती, भविष्य आदी विषयांवर चर्चा करणारे एक संमेलन पार पडले. त्यामध्ये याविषयीच्या अनेक पैलूंवर बरीच चर्चा, वाद झालेत.
खरं संगीत हे बुद्धीतून अर्थात मेंदूतून जन्माला येतं की हृदयातून हे नेहमीचा वाद इथेसुद्धा दिसून आला आणि बराच रंगलासुद्द्धा ! काहींच्या मते जेव्हा एखादी गोष्ट काळजातून बाहेर पडते तेव्हा तिच्यात सर्व भाव-भावना ओतप्रोत भरलेल्या असतात, त्यामुळे तसे संगीत हेच सच्चे संगीत असं एका बाजूचं जोरदार म्हणणं होतं.

तर आपल्या सगळ्या भावना नियंत्रित करणारा हा मेंदू... त्यामुळे त्यातून येणारे संगीत हे खरं-खुर, तेच वस्तुत: शास्त्रीय संगीत असं एका बाजूचं मत दिसून आलं.

खरं म्हणजे हा वाद अनेक ठिकाणी आजवर दिसून आला आणि आजही तो त्याच उत्साहाने चघळलासुद्धा जातो. माझ्या मते हा वाद तसा निरर्थक आणि आधारहीन आहे. एखाद्या व्यक्तीला वैयक्तीक पातळीवर जे उमगते, उमजते आणि समजते तो त्या पद्धतीने ते मांडण्याचा प्रयत्न करत असतो.

संगीत हा ईश्वरापर्यंत पोहचण्याचा सगळ्यात सुकर मार्ग म्हणून अनेक विद्वत जनामध्ये मानला जातो. आणि ईश्वरापर्यंत अर्थात अंतिम सत्यापर्यंत जाण्याचा मार्ग हा प्रत्येकासाठी वेगळा असतो. त्यामुळे संगीत हा त्यातलाच एक मार्ग.

वस्तुत: गायानाबाबतीत बोलायचं झालं तर, ईश्वराने आपल्याला कंठ हा मेंदू आणि हृदय या दोघांच्या मध्यभागी दिलेला आहे. त्यामुळे मला तरी वाटतं, की वैचारिक आणि भावनिक या दोघांच्या योग्य मिश्रणातून आलेलं संगीत हे पवित्र संगीत. कारण विचारहीन भावना आणि भावनाशून्य बुद्धी या दोन्ही गोष्टी निरर्थकच.

तेव्हा ज्याने त्याने आपल्या पद्धतीने, आपल्याला समजलेले सादर करणे हेच शुद्ध, ईश्वरी अन् पवित्र संगीत !