आपल्या पुरातन,प्राचीन साउल धर्माशी कायम एकनिष्ठ राहिलेल्या
ग्रेसने आणि त्यांच्या कवितेने कधीच कोणाचे मिंधेपण स्वीकारले नाही की
पुरस्कार,मानमरातब यांची तमा बाळगली नाही.अधिमान्यतेची असूया बाळगली नाही.When you have
finished with others..That is my time. हे ग्रेस चे
वाक्य त्यांना मिळालेल्या पुरस्काराच्या आणि त्यांच्या वेळेच्या बाबतीत तंतोतंत
लागू पडले.त्यामुळेच ‘विदर्भ भूषण’ पुरस्कार स्वीकारताना “आता या पैशांचं मी काय
करू? थोडे आधी मिळाले असते तर मी शाम्पेन आणि सिगरेट तरी प्यायलो असतो आणि विदर्भ
भूषण दिलात म्हणून तुम्ही चिंता करू नका,मी आताच स्पष्ट करतो की मी ‘महाराष्ट्र
भूषण’ च्या शर्यतीत नाही.” असे ते थेट मुख्यमंत्र्यांना बोलू शकले.’साहित्य
अकादमी’ पण त्यांनी गाजावाजा न करता स्वीकारला तो “The politeness of my poetry
is always behind the curtain..But it is always above the door” या नेमस्त पणामुळेच.
माणूस असो की देव,त्यांना कधीना कधी दुःख,वेदना
यांच्याशी सामना करावा लागतो त्यामुळे या दुःखाची जाणीव अत्यंत प्राथमिक अवस्थेत
करून देणे इष्ट ठरते.या जाणीवेची व्यवस्था ग्रेस ने आपल्या ‘निरोप’ या कवितेतून
खालील प्रमाणे केलेली आहे
“मी खरेच दूर निघालो..तू येऊ नको ना मागे
तळातावरचा फोड फुटणार..अशा अनुरागे
वेदनेला नसते वीण..पडछाया तुडवीत जाणे
अंगाईत मुलांना तू सांग इतकेच गाणे”
वेदना,कारुण्य,दुःख यांनी ग्रेस ची कविता समग्र
व्यापलेली आहे हे दु:ख व्यक्त करण्यासाठी,वेदनेचा आकांत करण्यासाठी प्रतिमांचा
वापर केल्यामुळे दुर्बोधता हे ग्रेस च्या कवितेचे अटळ प्राक्तन ठरते.ग्रेस ची
कविता उमजण्या साठी नाही तर अनुभवण्यासाठी साठी आहे हे ज्यांना समजले ते ग्रेस
च्या कवितेत वितळले आणि एकरूप झाले आणि समृद्ध झाले.
२६ मार्च २०१२ रोजी ग्रेस चे कार्कारोगाबरोबरचे युद्ध
त्यांचे ‘रक्तगंधाचे दिवे’ मालावूनच संपले.
“माझ्या कुळाप्रमाणे..मृत्यू मला दुपारी
आईस दर्पणातून..बोलावतात घारी”
असे लिहिणाऱ्या ग्रेस ला मृत्यू मात्र सकाळी आला.ग्रेस
गेले आणि साहित्य विश्वात एक पोकळी निर्माण झाली.
“घरभर सारणाचे पात्र सांडून जाई..
फिरुनी माझा पुन्हा निर्वंश होई”
असे ‘ओल्या वेळूच्या बासरी’ तून प्रतिपादन करताना ग्रेस
ने आपला वारसदार सोडाच पण उत्तराधिकारी देखील कोणी नाही हे कदाचित सूचित केलेले
आहे.त्यामुळे ही पोकळी भरून येणे खूप अवघड आहे.
परंतू आपल्याला जे समृद्ध केलेले आहे त्याची कृतज्ञता आज
ग्रेस नाहीत तरी किंवा ग्रेस नाहीत म्हणूनच आग्रहीपणे व्यक्त केली पाहिजे..आणि त्यासाठी
ग्रेस ने माझ्या झोळीत टाकलेल्या शब्दांचाच आधार घेणे क्रमप्राप्त आहे...
“आभाळातून गळते माती...वारा उदास भटके
तू
गेल्यावर साजणवेळी...शब्द झाले पोरके..”
चंद्रमाधवीच्या प्रदेशाचा शेवट करताना ग्रेस ने
रविंद्रनाथ टागोरांचे एक वाक्य उधृत केलेले आहे
And when my voice is silent in death, my song will
speak in your living heart.
हे
भा.रा.तांब्यांच्या “मी जाता राहील काय..जन पळभर म्हणतील हाय हाय” या विदग्ध
सत्यापेक्षा निश्चित आशादायी आहे.
हा आशावाद ग्रेस ने देखील केव्हाच व्यक्त केला आहे
“ते झरे चंद्रसजणांचे..ही धरती
भगवी माया
झाडांशी निजलो आपण..झाडांत पुन्हा उगवाया”
ग्रेस कुठेतरी उगवले असतील आणि ‘रहस्य शरणाची दैवी लिपी’
पुन्हा घेऊन येतील हा आशावाद आपण बाळगण्यास काय हरकत आहे ?
मकरंद.गजानन.दीक्षित
No comments:
Post a Comment