ग्रेस यांच्या साहित्यिक,तात्विक योगदानाचे वैशिष्ट्य म्हणजे ते केवळ निर्मिती करून थांबले नाहीत तर त्या निर्मिती प्रक्रियेचा,त्या निर्मिती आधी निर्माण होणाऱ्या मानसिक आंदोलनांचा त्यांनी डोळस वेध घेतला.’मितवा’ असो ‘चर्चबेल’ असो वा अगदी शेवटचे ‘ओल्या वेळूची बासरी’ असो हे ललितलेख संग्रह या निर्मिती प्रक्रियेच्या वेधाचे आविष्कार आहेत आणि त्या साठी ग्रेस ने पौराणिककथा,जातककथा,दंतकथांचा आधार घेतला.त्यामुळेच ग्रेस यांच्या कवितेत द्रौपदी,कुंती,उर्मिला,गांधारी ही पौराणिक पात्रे येतात त्याच बरोबर घोडा,सांड,कावळा,हंस,गरुड सुद्धा प्रतीमारुपाने येतात.ग्रेस यांची कविता द्वैती आहे.त्यांचे महाभारताचे किंवा इतर पुराण कथांचे आकलन आणि निष्कर्ष प्रवाहास छेद देणारे आहेत.त्यामुळेच ग्रेस
धृतराष्ट्र आंधळा का..? हा प्रश्न जीव घेई”
असा विषाद व्यक्त करतात आणि काही प्रश्न उपस्थित करतात आणि असे करत असताना त्यांनी कविता म्हणजे काय याचे चिंतन ‘कावळे उडाले स्वामी’ मध्ये केलेले आहे.If your
reciprocation ceases to the world,you go back to your basic internal journey
again and again.To this act some one had said poetry.
ग्रेस यांच्यावर कोणाचाही प्रभाव नव्हता.पण आरती प्रभू बद्दल त्यांना आत्मीयता होती. जी.ए बरोबर जुळलेले त्यांचे मैत्र सर्वश्रुत आहे.स्वभाव,लेखनशैली आणि अगदी मृत्यूस कारण ठरलेला कर्करोग असो जी.ए आणि ग्रेस मधले हे समान धागे होते.हे सजातीय धृव पत्रातून एकमेकांना भेटले पण त्यांनी प्रत्यक्ष भेटणे टाळले.ग्रेस ना याचे कारण विचारले असता ते उसळून म्हटले “आमच्या अमूर्त भेटीला मूर्त स्वरूप दिले असते तर आम्ही दोघेही कोसळून,उन्मळून पडलो असतो”.माझ्या निर्मितीचे केंद्र माझा master आणि माझ्या आईकडे आहे असे ग्रेस चे सांगणे होते.
संध्याकाळ ही कायम ग्रेस ची निर्मिती वेळ राहिली.संध्याकाळ,कातरवेळ,सांजवेळ हे तिन्ही शब्द सूर्यास्ताच्या आणि चंद्रोदयाच्या मधल्या काळाचे सुचन करतात..पण त्यातल्या अर्थामध्ये सूक्ष्म भिन्नता आहे.ही भिन्नता ग्रेसच्या कवितेमध्ये ठळकपणे जाणवते.या तिन्ही शब्दांच्या अर्थाचा समुच्चय करून ग्रेस ने ‘साजणवेळ’ या अनोख्या शब्दाचा उपयोग केलेला आहे.
अनेक प्रथितयश संगीतकारांना ग्रेस च्या शब्दांनी मोहिनी घातली.एकाच वेळी पराकोटीची टीका आणि वाचक,रसिकांचे उत्कट प्रेम वाटयाला आलेला ग्रेस सारखा ‘कलाकार’ क्वचितच सापडेल.समकालीन कवींना निसर्गकवी,प्रेमकवी,सामाजिक कवी अशी बिरुदे मिळत असताना ग्रेस च्या माथ्यावर मात्र दुर्बोधतेचा शिक्का बसला. I want to see my cradle and grave..both hanging म्हणणाऱ्या ग्रेस ने देखील तो शिक्का पुसण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला नाही.
टीकेमुळे असो वा स्वभावामुळे ग्रेस चे लोकांत मिसळणे मात्र कमी कमी होत गेले.पण ग्रेस वर मनापासून प्रेम करणाऱ्या वाचकांनी ‘आंधळ्या वाटेवरून’ त्यांचा माग काढलाच.कदाचित हेच त्यांनी ‘फुंकर’ या कवितेच्या एका कडव्यातून (निवडुंग चित्रपटातील ‘घर थकलेले संन्यासी’ या गाण्यातून) सूचित केलेले असावे.
“मी भिवून अंधाराला..अडगळीत लपुनी जाई
ये हलके हलके मागे..या दरीतली वनराई”
यातील अंधार ही प्रतिमा टीकेसाठी आणि वनराई ही प्रतिमा वाचकांच्या टवटवीत हिरव्या प्रेमासाठी असू शकेल.
ग्रेस ना हा अर्थ अभिप्रेत नसेल देखील..पण “कवितेच्या अर्थावर माझा अधिकार नाही” असे ग्रेस ने नेहमीच सांगितले आहे.ग्रेस च्या कवितेचा प्रत्येक वेळी वेगळा अर्थ लागतो आणि ग्रेस च्या मनातील आंदोलन आणि वाचकाच्या मनातील आंदोलन यामध्ये ती एका विशिष्ट क्षणी सेतू निर्माण करते.हेच ग्रेस ची कविता ‘समजली’ नाही तरी ‘आपली’ वाटण्याचे कारण असावे.जी.एं च्या पत्रवेळेतील एका उल्लेखाप्रमाणे ज्या कवितेमुळे कायिक संवेदना उदा.अंगावर रोमांच येणे,स्तब्ध वाटणे,डोळ्यात पाणी येणे इ निर्माण होतात ती कविता सर्वश्रेष असते.या निकषानुसार ग्रेस हे अभिजात आणि त्यांच्याच भाषेत प्राचीन कवी होते हे मान्य करावे लागते.
मकरंद.गजानन.दीक्षित
मकरंद.गजानन.दीक्षित
No comments:
Post a Comment