Sunday, July 31, 2011

संगीत...!!!


नुकतचं संगीत आणि विशेष करून शास्त्रीय संगीत, त्याची सद्यस्थिती, भविष्य आदी विषयांवर चर्चा करणारे एक संमेलन पार पडले. त्यामध्ये याविषयीच्या अनेक पैलूंवर बरीच चर्चा, वाद झालेत.
खरं संगीत हे बुद्धीतून अर्थात मेंदूतून जन्माला येतं की हृदयातून हे नेहमीचा वाद इथेसुद्धा दिसून आला आणि बराच रंगलासुद्द्धा ! काहींच्या मते जेव्हा एखादी गोष्ट काळजातून बाहेर पडते तेव्हा तिच्यात सर्व भाव-भावना ओतप्रोत भरलेल्या असतात, त्यामुळे तसे संगीत हेच सच्चे संगीत असं एका बाजूचं जोरदार म्हणणं होतं.

तर आपल्या सगळ्या भावना नियंत्रित करणारा हा मेंदू... त्यामुळे त्यातून येणारे संगीत हे खरं-खुर, तेच वस्तुत: शास्त्रीय संगीत असं एका बाजूचं मत दिसून आलं.

खरं म्हणजे हा वाद अनेक ठिकाणी आजवर दिसून आला आणि आजही तो त्याच उत्साहाने चघळलासुद्धा जातो. माझ्या मते हा वाद तसा निरर्थक आणि आधारहीन आहे. एखाद्या व्यक्तीला वैयक्तीक पातळीवर जे उमगते, उमजते आणि समजते तो त्या पद्धतीने ते मांडण्याचा प्रयत्न करत असतो.

संगीत हा ईश्वरापर्यंत पोहचण्याचा सगळ्यात सुकर मार्ग म्हणून अनेक विद्वत जनामध्ये मानला जातो. आणि ईश्वरापर्यंत अर्थात अंतिम सत्यापर्यंत जाण्याचा मार्ग हा प्रत्येकासाठी वेगळा असतो. त्यामुळे संगीत हा त्यातलाच एक मार्ग.

वस्तुत: गायानाबाबतीत बोलायचं झालं तर, ईश्वराने आपल्याला कंठ हा मेंदू आणि हृदय या दोघांच्या मध्यभागी दिलेला आहे. त्यामुळे मला तरी वाटतं, की वैचारिक आणि भावनिक या दोघांच्या योग्य मिश्रणातून आलेलं संगीत हे पवित्र संगीत. कारण विचारहीन भावना आणि भावनाशून्य बुद्धी या दोन्ही गोष्टी निरर्थकच.

तेव्हा ज्याने त्याने आपल्या पद्धतीने, आपल्याला समजलेले सादर करणे हेच शुद्ध, ईश्वरी अन् पवित्र संगीत !

No comments:

Post a Comment