Saturday, September 10, 2011

कला : वाट पाहण्याची !

सध्याचं आयुष्य आणि जग अत्यंत वेगवान झालं आहे. सगळ्या गोष्टी हाकेच्या अंतरावर आल्या आहेत. Internet मुळे म्हणा किंवा इतर सगळ्या सुविधांमुळे म्हणा सगळं जगणंच अतिवेगवान होऊन बसलंय. कोणाला कुठल्या गोष्टीसाठी थांबायची सवय आणि गरज राहिलेली नाही. एकेकाळी रात्रीच्या गर्भात फक्त अंधार धुंडाळनाऱ्या मानवी समाजाला आता तंत्रज्ञानाचा लख्ख प्रकाश हाती लागला आहे.

पूर्वी प्रेयसी आपल्या प्रियकराची वाट पाहत तासनतास काढायची. तेव्हा तिच्या वेळेची किंमत नव्हती असं नाही. परंतु त्या वाट पाहण्यातला त्रास हा बोचरा मात्र तेव्हढाच लाडीक सुद्धा होता. कोणतही नातं रुजण्यासाठी, अंकुरण्यासाठी काही विशिष्ट कालावधी जावा लागतो. नातं एखाद्या बिजासारख असतं. बीज रुजून अंकुरून त्याचा वृक्ष होणं ही एक प्रक्रिया आहे. ते बीज मातीशी एक जिव्हाळयाच नातं तयार करतं. मग पाणी, इतर घटक अशा सगळ्या पोषनातून ते आकाशाकडे झेपावत.

नातं हेसुद्धा असाच असतं. आज संगणक, SMS असाह वेगवेगळ्या माध्यमातून लोक सदैव बोलत असतात. त्यामध्ये उसंत अशी नाहीच. खाताना, झोपताना, उठताना सदैव हे चालूच असतं. व्यक्त होणं ही गरज मी समजू शकतो. परंतु हे व्यक्त होणं नाही तर हा मौखिक डायरिया आहे असं मी मानतो. 

कोणत्याही गोष्टीसाठी वाट पाहणं फार महत्वाच असतं. केवळ एखाद्या गोष्टीसाठी थांबणं आणि वाट पाहणं यात फरक आहे. थांबण्यामध्ये चिंता असते. इप्सित पूर्ण होण्याची शाश्वती नसते. परंतु वाट पाहण्यात एक विश्वास असतो. कितीही वेळ लागत असला तरी एक खात्री त्यात असते. प्रियकर कितीही उशिराने आला तरी प्रेयसी वाट पाहत राहते. कारण तो येणार हा विश्वास असतो. 

चिंतारहित, विश्वासपूर्वक वाट पाहण्याने नाती अधिक फुलतात, खुलतात आणि खोलवर जाऊन रुजतात देखील !

No comments:

Post a Comment