Thursday, September 29, 2011

मृत्यू...आयुष्याला समांतर?

'समांतर' हा मराठी सिनेमा नुकताच बघण्यात आला. जन्म आणि मृत्यू या माणसाच्या आत्यंतिक जवळच्या आणि जिव्हाळ्याच्या विषयावर त्यामध्ये भाष्य केले आहे.

आयुष्य जगण्याला एक विशिष्ट उर्मी असावी लागते. ही उर्मीच संपली तर मग जगायचं कशासाठी हा यक्ष प्रश्न उभा राहतो. परंतु म्हणून आयुष्य संपवणं हे कितपत योग्य आहे? जैन धर्मामध्ये 'संथारा' हा एक धार्मिक विधी आहे. आयुष्यात सगळी कर्तव्ये पूर्ण केलेला व्यक्ती 'स्वेच्छेने' अन्नग्रहण, जलग्रहण सोडून देतो. त्यामुळे काही दिवसात तो व्यक्ती आपली संपूर्ण शारीरिक शक्ती संपून मरण पावते. 'संथारा' या प्रठेवरून अनेक वाद झालेत. तो एक आत्महत्येचा प्रकार आहे असा सुद्धा काहींनी सर्वोच्च न्यायालयात आरोप केला.

 परंतु आत्महत्या, दयामरण आणि इच्छामरण यामध्ये हेतू आणि प्रेरणा या दोन गोष्टींचा फरक आहे. हवी असणारी एखादी गोष्ट न मिळाल्यास व्यक्ती आत्महत्येच्या मार्गाला जातो. परंतु आयुष्यात सगळं काही मिळाल्यानंतर मनुष्याची इच्छामरणाची तयारी आणि इच्छा होते.

मनाविरुद्ध एखाद्याला जबरदस्तीने काही करायला लावणे हे आपल्या कायद्याविरुद्ध आहे. तर मग इच्छेविरुद्ध, जगायची इच्छा नसताना एखाद्याला 'जगायला' लावणे हा गुन्हा नव्हे का? नोकरीतील कर्तव्ये पूर्ण झाल्यानंतर लोक निवृत्ती घेतात, खेळाडू ठराविक कालावधीनंतर खेळातून निवृत्ती पत्करतात. तर मग आयुष्य आता पूर्ण जगून झालंय, जगण्यात आता स्वारस्य उरलेले नाही, आता जगणे थांबवावे असं एखाद्याला वाटत असेल तर त्यात चूक काय हेच नेमकं कोडं आहे. इच्छेने आयुष्य 'थांबवणं' हे प्रत्येकाने स्वत:च ठरवायला पाहिजे. त्यात गैर असे काहीही नाही.

No comments:

Post a Comment