Sunday, October 2, 2011

प्रतिष्ठितांचे प्रमाद ...

महाविद्यालयाच्या कामानिम्मित मुंबईला एका प्रतिभावंत, नामवंत आणि वरदवंत अशा एका कवींकडे जाण्याचा योग आला. आम्ही तीन लोक मोठ्या उत्साहाने त्यांना भेटण्यासाठी निघालो होतो. तत्पूर्वी महिनाभर आधी कवी महोदयांची तारीख घेऊन ठेवलेली होतीच.

याशिवाय निघण्याच्या आधी त्यांना फोन करून येण्याबद्दल कळवलेसुद्धा! कवी महोदयांच्या तारखा घेणे-देणे, वेळ ठरवणे ही सगळी कामे त्यांच्या सुविद्य पत्नीच करत होत्या. त्यांनी आम्हाला 'या' म्हणून सांगितले. उत्साहाने आम्ही घरी पोहचलो.

परंतु कवी महाशय आमचा कार्यक्रम रद्द करून दुसऱ्या ठिकाणी एका पूर्वनियोजित कार्यक्रमाला निघून गेले होते. आम्हाला तारीख देणाऱ्या त्यांच्या पत्नी आम्हाला भेटल्या. परंतु त्यांनी अत्यंत निष्काळजीपणे त्यांनी आम्हाला नंतर या एवेढेच सांगितलं.

या सगळ्या घटनाक्रमामध्ये आम्हाला कविमहोदय नाहीत यापेक्षा आम्हाला जी वागणूक मिळाली त्याचे दु:ख अधिक होते. आम्हाला भेटण्यापेक्षा अनेक आणि अधिक महत्वपूर्ण कामे त्यांना असू शकतात आणि असतात हे पूर्णपणे मान्य. शिवाय या कविवर्यांच्या प्रतिभेविषयी सुद्धा मला पूर्वी होता तेव्हढाच आदर आजही आहे आणि राहीन. परंतु साहित्यामधील आपलं असणं आपल्या आजूबाजूच्या लोकांमुळे खोटं ठरू शकतं याची जाणीव या सगळ्या प्रतिष्ठितांना असणं फार फार महत्वाचं असतं.

महापुरुषांचा  पराभव त्यांचे अनुयायीच करतात असं म्हंटल जातं. मला वाटतं या गोष्टीचा अधिक मोठ्या पातळीवर विचार करायला हवा. आपल्या प्रत्येकात एक महापुरुष असतो.आणि याही बाबतीत  त्याचे 'अनुयायी' त्याचा पराभव करत असतात. त्यामुळे त्याची काळजी घेणे आपापल्या हातात...


No comments:

Post a Comment