Tuesday, October 8, 2013

महापुरुषांचा पराभव

आपल्या विचाराने, कर्तुत्वाने, वर्तनाने आदर्शांच्या, प्रतिष्ठेच्या, सन्मानाच्या अत्त्युच्च शिखरावर पोहचलेले कितीतरी महापुरुष होऊन गेलेत. समाजाने त्यांच्या विचारसरणीचा अवलंब केला, त्यांना सन्मान दिला. राजे शिवाजी, विवेकानंद, डॉ.आंबेडकर अशा कितीतरी लोकांची नावं यात सांगता येतील. केवळ सामाजिक किर्तीच त्यांना मिळाली असं नाही, तर आत्मिक समाधानाचाही विशाल महासागर ते पार करून गेलेत.

अशा  महापुरुषांनी आपल्याला एक वैचारिक दिशा दिली. जगण्याचा मार्ग दिला. आम्ही हयात नसलो तरी, आमच्या विचारांच्या रस्त्यावर तुम्ही चालत राहा, असा संदेश त्यांनी देऊन ठेवला.

परंतु या साऱ्या महापुरुषांनंतरची आजची अवस्था काय आहे? जात, धर्म या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन या महापुरुषांनी आपले विचार जगाला दिलेत. मात्र आज या महापुरुषांच्या अनुयायांनीच त्यांचा पराभव केला आहे.

आपल्या स्वार्थासाठी अनुयायांनी प्रत्येक महापुरुषाला जातीची, स्वत:च्या विचारांची चौकट दिली. एक गट आंबेडकरांना आपला म्हणतो, शिवाजी महाराज विशिष्ट जातीचेच असा समज पसरवण्यात येतो. टिळकांच्या वरपण आम्ही जातीधर्माचं लेबल लावलं.  अशी बरीच उदाहरणे देता येतील. परंतु असं जातीपातीच्या चोकटीत या लोकांना अडकवणे म्हणजे त्यांच्यावर आरोप करणे आहे असं माझं अगदी स्पष्ट मत आहे.

समाजाचे हे वर्तन म्हणजे नैतिक आणि वैचारिक अध:पतनच म्हणावे लागेल. परंतु या सगळ्यामुळे या महान लोकांच्या विचारांपासून, त्यांनी दाखवलेल्या उन्नतीच्या मार्गापासून आपण वंचित राहतो, ही खरी शोकांतिका आहे.

त्यामुळे वि,स. खांडेकर म्हणतात तद्वत महापुरुषांचा पराभव त्यांचे अनुयायीच करत असतात!

No comments:

Post a Comment