Thursday, October 10, 2013

सांगा, कसं जगायचं?

मनुष्य जन्म हा मोठ्या कष्टाने मिळतो असं म्हणतात. याशिवाय आईच्या उदरातून बाहेर येणं हेसुद्धा मोठं दिव्यच असतं.

अशी आयुष्यासारखी दुर्मिळ गोष्ट खरं तर अगदी आनंदाने उपभोगायला पाहिजे. एवढ्या सगळ्या कष्टातून मिळालेल्या या आय्ष्याची खरंच आहे का हो किंमत आपल्याला? की आता जगल्याशिवाय पर्याय नाही, आत्महत्या समाजमान्य नाही म्हणून जगत जातो आपण? फक्त मिळालयं म्हणून जगतोय का आपण?

आयुष्यात कितीतरी प्रसंग येत असतात. प्रत्येकाचा त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन हा मात्र वेगवेगळा असतो. काही आपल्यातलेच त्याकडे अगदी सहजपणे, मजा म्हणून बघतात. तर काही काही मात्र त्याकडे काहीतरी कटकट, त्रास म्हणून बघतात.

मला वाटतं दृष्टीकोनात असा फरक पडण्यामागे व्यक्तीची जडण-घडण फार महत्वाची ठरते. माणसावर आजूबाजूच्या परिस्थितीमुळे होणारे संस्कार, त्याच्या वाचनाचा एकंदरीत परीघ या गोष्टी इथे महत्वाच्या होतात. अनेकदा चांगलं वाचन करा, असं नेहमी आपण ऐकत असतो. तेव्हा हे फार महत्वाच वाटत नाही. परंतु आयुष्यात जेव्हा कसोटीचे प्रसंग येतात, तेव्हा या वाचनाने मनावर केलेले संस्कार नकळतपणे कामी येतात.

मुळात काहीतरी अपेक्षा ठेवणे, सातत्याने काहीतरी मिळवण्यासाठी धावत राहणे हे सगळ्या अस्वस्थतेचं मूळ आहे. याचा अर्थ अल्पसंतुष्ट राहा असा नाही. परंतु एकदा सगळं विसरून, बाजूला ठेऊन नुसतं जगायला काय हरकत आहे! फक्त आनंदाने जगायला काय हरकत आहे?

हे पाहिजे, ते पाहिजे कशाला म्हणतात? अहो, मोठा दुर्मिळ मनुष्य जन्म मिळालाय की..अजून काय हवं?  

No comments:

Post a Comment