Thursday, October 13, 2011

आम्ही ( फक्त ) पाय ओढतो..

'चांगलं काम करा, चांगलं फळ मिळेल', असं नेहमी म्हंटल जातं. परंतु मला व्यक्तिश: हे मान्य नाही. कारण जी कामं केल्यानंतर फळाची अपेक्षा केली जाते, ती चांगली होणं तसं कठीणच! असो. मला इथे जे काही सांगायचं आहे, तो मुद्दा जरा वेगळा आहे.

अनेकदा आपण अगदी चांगल्या उद्देशाने कामांना सुरुवात करतो. यातून काहीतरी चांगलं विधायक घडवूया, असा निर्मळ हेतू असतो आपला. त्यामुळे,बरोबरचे सगळे लोक या कामी सढळ मनाने मदत करतील अशी आपण अपेक्षा करतो. परंतु खरोखर असं होतं का? जसं अगदी सरळसाध्या उद्देशाने आपण सुरुवात करतो, त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी होतात? सहकारी निर्भेळ मनाने मदत करतात?

खरं तर प्रत्यक्ष काम सुरुवात केल्यानंतर किती अडथळे येतात, हे आपण सर्वच अनुभवत असतो. या सगळ्या अडथळ्यात सर्वाधिक दुर्दैवी जर काही असेल तर ते म्हणजे, आपल्या काही सहकाऱ्यांचाच पायओढू धंदा..! अनेक लोकांसोबत जेव्हा काम करावं लागतं तेव्हा प्रत्येक निर्णय घेतेवेळी वाद हा अपेक्षित असतोच. परंतु कितीतरी वेळा निष्कारण विरोधासाठी विरोध करणारेही असतात. केवळ कामात अडथळा आणायचा एवढा एककलमी कार्यक्रम त्यांनी हाती घेतला असतो.

अशावेळी प्रचंड मन:स्ताप होतो. सगळं सोडून द्यावसं वाटतं. ज्यांच्यासाठी हे करत आहोत, तेच अशा पद्धतीने वागत असतील,तर असं काम करण्यात काय अर्थ, असाही विचार मनात चमकून जातो. परंतु म्हणून हातचं काम सोडून द्यायचं की काय? तर मुळीच नाही. याकडे एक संधी म्हणून बघा.

या सगळ्या अडथळ्यांवर मात करून, तरुन जाणं हेच तर सामर्थ्याचं प्रतिक आहे. आपला उद्देश जर खरोखर निर्भेळ असेल तर आपण यशस्वी होणार हे नक्की. फक्त या वाटेतल्या धोंड्याना तेव्हढ्याच जोराने धडक देऊन, आपली निष्ठा कायम ठेऊन काम करत राहणं हे मात्र महत्वाचं असतं.

No comments:

Post a Comment