Saturday, October 15, 2011

सिग्नल आयुष्यातले

धावणं, पळणं, सतत काहीतरी मिळवण्यासाठी पळापळ करणं हे आपल्यातल्या बऱ्याच जणांच्या बाबतीत बघयला मिळतं. काहींच्या मुळी रक्तातच स्पर्धा असते. सतत काहीतरी मिळवण्यासाठी ते धडपडत असतात. ही धडपड इतक्या टोकाची असते, की आयुष्य आणि स्पर्धा म्हणजे त्यांना समानार्थी वाटायला लागतात.

आणि अगदी शांतपणे जगणाऱ्यांना हे लोक मुर्ख समजतात. सतत आपण मागे पडू, कमी पडू अशी भीती त्यांना असते. ही असुरक्षिततेची भावना अगदी खायला उठली म्हणजे हे लोक पुन्हा धावायला लागतात, पळायला लागतात.

स्पर्धा  करू नका, अल्पसंतुष्ट राहा असं मला सांगायचं नाहीये मुळी. पण स्पर्धा किती करायची, धावायचं किती याची मर्यादा ठरवून घेतली पाहिजे. कारण एवढं धावून इप्सित स्थळी पोहचल्यावर, तिथला आनंद उपभोगता येण्याएवढं तरी बळ शरीरात असायला पाहिजे!

रस्त्यावर भरधाव वेगाने जाणारे अनेक असतात. सावकाश, आनंद लुटत गाडी चालवणाऱ्यांना मागे टाकून ते पुढे निघून जातात. परंतु लवकरच पुढे रस्त्यावर सिग्नल आडवा येतो आणि हे धावत सुटलेले तिथेच थबकून राहतात. आणि मागून सावकाश येणारेसुद्धा तिथे पोहचतात...पुन्हा सगळे एकाच पातळीवर, एकाच रेषेवर. आणि सिग्नल सुटला की पुन्हा तीच धावपळ सुरु होते, पुढचा सिग्नल येईपर्यंत!

आयुष्यातसुद्धा असे सिग्नल येत असतात...सगळ्यांना समान पातळीवर आणणारे. खरी मजा, खरा आनंद हा प्रवासात असतो,  शेवटच्या उद्देशालापण महत्त्व आहेच. परंतु रडतखडत प्रवास करून कुठेतरी पोहचण्यात काय अर्थ? तेव्हा या आयुष्याचा प्रवास आनंदाने, मजेत करा..नाहीतर सिग्नल्स आहेच थांबवायला तुम्हाला!



No comments:

Post a Comment