Wednesday, October 19, 2011

पंडित हरिप्रसाद चोरासिया

आयुष्यात सगळं जेव्हा अपुरं वाटायला लागतं तेव्हा संगीत ही कमी भरून काढतं. संगीताची जादू  अनामिक असते. एक आतली अशी ओढ त्यात असते. मात्र  एखाद्या वेड्या, मनस्वी माणसालाच संगीत भारून टाकू शकतं.  सगळ्या गोष्टीत वैचारिक निष्कर्ष काढणाऱ्यांनी संगीत ऐकूच नये. कारण संगीत हे मुक्त, खुल्या मनाचे हुंकार असतात. ते जाणवण्यासाठी आपलं मनसुद्धा तसाच असावं लागतं.

संगीतात बासरीवादन कठीण समजलं जातं. इतिहासात कृष्णाच्या सुरेल बासरीच्या कथा आपण ऐकल्या आहेत. जवळच्या इतिहासात बघितलं तर पन्नालाल घोष यांनी बासरीला नवं परिमाण मिळवून दिलं. एका बांबूच्या तुकड्याने साऱ्या जगाला वेड लावलं.

या सगळ्या संगीतातल्या वाटेमधला एक जादुगार, साधू, वाऱ्याचं संगीत प्रत्यक्ष उतरवणारा योगी म्हणजे पंडित हरिप्रसाद चोरासिया ! नुकतंच महाविद्यालयाच्या मासिकासाठी पंडितजींशी भेटण्याचा दुर्मिळ,सुवर्ण योग आला.

पंडितजींना भेटताना त्यांच्या मोठेपणाचं दडपण होतं. काही काळ गुरुकुलात बसल्यानंतर गाडीतून पंडितजी अचानक आलेत. त्यांच्या वटवृक्षासारख्या व्यक्तिमत्वाने सगळं वातावरण प्रसन्न आणि पवित्रतेने भरून गेलं. पण पंडितजी बोलायला लागलेत आणि मनावरचं सगळं दडपण क्षणात त्यांच्या साधेपणाने आणि तेव्हढ्याच विशाल मनाने बाजूला झालं.

हा आयुष्यातला खूप मौल्यवान क्षण होता. त्यावेळी 'बरखा ऋतू' या कार्यक्रमातील पंडितजींचा मल्हार मला आठवला. त्या दिवशीच्या त्या मल्हारने मी अक्षरश: ओला झालो होतो. ते चिंब भिजणं खूप आनंददायक होतं. पंडितजींसारखा आभाळाला वेड लावणारा, प्राण्या-पक्ष्यांना आपल्याकडे खेचणारा, ऋतुंना अधिक आल्हाददायक बनविणारा साधक खरंच निराळा !

No comments:

Post a Comment