Saturday, October 19, 2013

पैसा, पैसा आणि पैसा...

माझा एक अगदी जवळचा मित्र आहे. साधारण तीन वर्षांपासून आम्ही मित्र आहोत. दोघांना एकमेकांच्या आवडी-निवडी व्यवस्थित ठावूक आहेत. हा मित्र अगदी व्यावसायिक दृष्टीकोनाचा, तर मी मानसिक शांततेवर, समाधानावर, उत्तुंगतेवर विश्वास असणारा.

नुकतीच या मित्राची एका मोठ्या कंपनीत मोठ्या पगारावर नियुक्ती झाली. या आनंदाच्या वेळी आम्ही एका रात्रभर गप्पा मारत बसलो होतो आणि सहज विषय आयुष्यावर आणि अंतिम सत्यावर गेला. आम्ही सारे अभियांत्रिकीचे विद्यार्थी. परंतु केवळ यांत्रीकतेपेक्षा संपूर्ण विकासावर भर देण्यासाठी आमच्या महाविद्यालयात तत्वज्ञान मंडळ, वाद-विवाद मंडळ अशी अनेक मंडळे आहेत.

मी या सगळ्या मंडळांचा सभासद आहे. तेव्हा अशी मंडळे अभियांत्रिकीच्या महाविद्यालयात कशाला हवीत, असं नेहमीप्रमाणे हे व्यावसायिक महाशय म्हणत होते. संगीत, तत्त्व, इतिहास या गोष्टी फक्त पुस्तकात शोभून दिसतात, असं चाकोरीबद्ध पद्धतीने तो बोलत होता.

माझ्या मते पैशाच्या पलीकडे जावून पलीकडच्या आयुष्याबद्दल दृष्टीकोन नसणाऱ्यांनी संगीत, समाधानी आयुष्य याबद्दल बोलूच नये. जेव्हा माणसाकडचं सगळ काही संपतं, तेव्हा त्याला केवळ त्याचे विचार, संस्कार, घडण हेच तारतात याचा मी कित्येकदा अनुभव घेतला आहे. केवळ विरंगुळा म्हणून संगीत, असा जर तुमचा दृष्टीकोन असेल तर संगीताची खरी जादू तुम्ही अनुभवूच शकणार नाही.

केवळ पैसा, पैसा आणि पैसा एव्हढाच जर तुमचा उद्देश असेल, पैशाने सगळी सुखं मिळतात असं आपल्या खोट्या तत्वांच्या बाह्य बुरख्याखाली जर तुम्ही लपवून ठेवून जगात असाल तर आयुष्यात एका टप्प्यावर तुम्हाला प्रचंड नैराश्य येणार हे नक्की. पैसा कमावू नका, असं नाही. परंतु फक्त पैसा हे अंतिम उद्देश असणं मात्र कमकुवत मनाचं लक्षण आहे ! खुलेपणानं, आस्वाद घेत आयुष्य जगा..पैसा केवळ साधन आहे, साधक मात्र नाही...

No comments:

Post a Comment