Friday, November 15, 2013

स्वीकारा..मात्र परिपूर्णतेने

प्रत्येकाला आयुष्यात काहीतरी हवे असते. पैसा, सत्ता असं बरंच काही..कोणाला चांगलं आरोग्य तर कोणी भरपूर प्रेमाचा भुकेला असतो. ही भूक अगदी कशाचीही असू शकते.

परंतु मनुष्य हा मोठा स्वार्थी प्राणी. हव्या असलेल्या गोष्टीच्या बाबतीतदेखील माणूस स्वार्थीपणा करतो. त्यातले सुद्धा केवळ जेव्हढे चांगले, स्वत:ला सोयीस्कर असेल तेव्हढेच स्वीकारण्याची त्याची मानसिकता असते. 

आता मला काय म्हणायचे आहे ते अगदी नेमकेपणाने सांगतो. सध्याच्या युगात पैसा, सुख-सोयी सगळं असलं तरी मनुष्याला प्रेम मात्र मिळत नाही. त्यामुळे प्रत्येक मनुष्य खऱ्या प्रेमासाठी चातकासारखा व्याकूळ असतो. माझ्या तरुण पिढीमध्ये अनेकदा, अनेक जण हे प्रेम आजूबाजूला असणाऱ्या मित्र-मैत्रिणींमध्ये शोधतात आणि त्यात गैर असेही काही नाही मुळी. 

कालांतराने मग काहींच्या मैत्रीच्या नात्याचं रुपांतर प्रेमात होतं. हे रुपांतरण खऱ्या प्रेमातून आलेलं म्हणा किंवा आकर्षणातून म्हणा पण होतं. मग हे प्रियकर आणि प्रेयसी प्रेमाच्या अखंड सागरात मनसोक्त भिजतात. काही वेळी वाद होतात, मिटतात, किंवा नातं तुटतंदेखील. पण प्रेमाची ही नाश एकदा खरच प्रेम निर्माण झालं तर अनुभवायलाच हवे अन्यथा प्रेम वाटूनदेखील ते दाबून ठेवलं तर आयुष्यभर प्रेमासाठी माणूस भुकेला राहतो.

परंतु प्रेमाचं असं हे नातं तुटेल, त्यामुळे मानसिक त्रास, वेदना होतील, आयुष्यात खूप किचकटपणा येईल अशा क्षुद्र आणि स्वार्थी विचाराने माणूस प्रेम करणं टाळतो. म्हणजे प्रेम तर हवे असते मात्र त्यासोबत येणाऱ्या वेदना, त्रास मात्र नको असतो. कोणतीही गोष्ट परिपूर्ण रीतीने स्वीकारण्याची माणसाची तयारीच नसते. खरं तर, भांडणं, वेदना हे सगळे प्रेमाचे अविभाज्य अंग आहेत. जसं त्यात आनद, सहवासाचे सुख हे सगळे असते त्याचप्रमाणे त्रास, दुख: हेसुद्धा असतात. 

मात्र हे सगळं स्वीकारायला सामर्थ्य असायला लागतं. दुर्दैवाने आज हे सामर्थ्य फार कमी झालंय. माणसाच्या मनाला अश्श्वाताची भीती सदैव सतावत असते. स्वार्थ आणि भेकडपणा हे दोन गुण
या अविभाजित स्वीकारण्याच्या प्रक्रियेमध्ये अडसर आहेत. परंतु काही हवे असेल तर परिपूर्णपणे ते स्वीकारा. चांगल्या आरोग्यासाठी व्यायामाचे कष्ट लागतात, सुखी आयुष्यासाठी अपार मेहनत लागतेच लागते, ज्ञान पाहिजे असेल तर साधना ही लागतेच हे सदैव लक्षात असू द्यावे.  

No comments:

Post a Comment