Sunday, October 23, 2011

बुरख्यामागचा चेहरा

'आवडता छंद' या विषयावर आपल्यातल्या बऱ्याच जणांनी शाळेत असतांना नक्कीच निबंध लिहिला असेल. छंद हा मनाला आनंद देणारा असतो. बऱ्याच जणांनी वाचन, लेखन, खेळ असे बरेच छंद त्यावेळी लिहिले असतील. निबंधाच्या गुणांपुरता हे छंद लिहिणं ठीक आहे.

पण आयुष्यात बऱ्याच लोकांना एक अगदी चाकोरीतला, सवयीचा, अगदी त्याविना राहवत नाही असा छंद असतो. हा छंद मोठं अघोरी आणि विकृत असतो. विशेषत: मनावर त्याचे खूप अनिष्ट परिणाम होतात.

आणि हा छंद म्हणजे सतत कोणावरतरी टीका करत राहणे हा आहे. हा मनुष्याचा अगदी स्वभावधर्म आहे. याशिवाय जगणं हेसुद्धा अनेकांना कठीण होऊन बसतं ! सतत हा असा, तो तसा असं बोलत राहणं हे त्याचं आद्य कर्तव्य असतं.

एखादा खूप पैसा खात असेल तर, सगळेच त्याच्यावर भरपूर टीका करत असतात. पण तो ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी आपण असतो तर आपण निर्मळ असतो का, हा विचार सुद्धा करावा. अशी माणसं पैसा खावून नक्कीच अडकतील, असं आपण म्हणतो. परंतु असं म्हणण्यामागे, त्या माणसाने जेव्हढा पैसा कमावला तेव्हढा आपण कमावू शकलो नाही, हे दू:ख तर आपण लपवत नसतो ना?

आणि असेही बरेच असतील की, जे सगळ्या जगाला टोप्या घालूनही सुखरूप आयुष्य जगत असतील. असं काही करायची संधी आपल्यालाही मिळाली असती, तर आपण ती सोडली असती का हो खरोखर?

मला वाटतं, स्वत:चा दुबळेपणा लपविण्यासाठी म्हणून माणसाने टीकेचा सोयीस्कर, समाजमान्य मार्ग स्वीकारला आहे. आपला भ्रष्ट चेहरा बुराख्यामागे लपवून ठेवण्याची ही एक पद्धत आहे.जगातला सगळ्यात मागास प्रदेश आपल्याच टोपीखाली तर नाही ना, हे प्रत्येकाने तपासून घेतले पाहिजे.

कोणाविषयी उगाच काही बोलाण्याधी स्वत:चं परीक्षण करणं फार महत्वाचं असतं. आणि जो ते करतो तोच बुरखा फाडून आयष्य मोकळेपणाने, खरेपणाने जगू शकतो.  

No comments:

Post a Comment