Tuesday, November 8, 2011

अनासक्तीतला आनंद...

काहीही सोडून देण्याची इच्छा न होणे म्हणजे आसक्ती. आपल्या आयुष्यात प्रत्येकाला कशाचीतरी आसक्ती असते, मग ती जीवनाची म्हणा, पैशाची म्हणा, सत्तेची म्हणा किंवा अजून कसली म्हणा. आपलं असणारं असं काही सोडून देणं हे काही तितकसं सोपं नसतं. हव्यास, आस, आसक्ती कोणाला सुटत नसते.

आसक्ती नसणं हे वैराग्याचं लक्षण आहे, संतपदाला पोहचल्यानंतरचं ते काम आहे असं काही लोक मानतात. पण आयुष्याचे खरं तर असे टप्पे वगैरे काहीच नसतात. आपल्या सोयीकरता माणसाने आयुष्याचं असं भंजन करून टाकले आहे, त्याला टप्प्याटप्प्यात विभागून टाकलंय.

आसक्ती सोडून देऊन जगणं हे खरंच खूप आनंददायक असतं. आसक्ती नसणं, म्हणजे कशाचाही उपभोग न घेता जगणं असं मुळीच नाही.याउलट कशाचाही पुरेपूर उपभोग घेऊन आनंद घेणं, हे आसक्ती सुटल्यानंतरच शक्य आहे.


कारण जेव्हा एखादी गोष्ट माझी आहे, असं माणूस म्हणतो, तेव्हा साहजिक ती गोष्ट आपल्यापासून दूर जाण्याचा धोका, दु:खं त्यात अंतर्भूत होतं. त्यामुळे, ती गोष्ट उपभोगतांना, त्यातल्या आनंदापेक्षा ती दूर जाण्याच्या शक्यतेचे दु:ख अधिक असते.

आसक्ती  सोडून जगतांना, कशाचाही अगदी निर्भेळ आनंद घेता येतो. कारण त्यात फक्त आणि फक्त आनंद असतो...कसल्याही प्रकारचे दु:ख, धोका त्यात नसतो. म्हणून आसक्ती त्यागणं म्हणजे काही आनंदाला पारखं होणं नव्हे...तर आनंदाला अधिक आनंदाने अनुभवणं...!!!

No comments:

Post a Comment