Saturday, November 12, 2011

बोलायला मिळेल का हो कोणी बोलायला....?


मनुष्याला स्वत:च्या सगळ्या गोष्टी आजूबाजूच्या लोकांसोबत वाटून घ्यायला खूप आवडतं. मनुष्य समाजप्रिय आहे हे याचे एक कारण असू शकते. समाजाशिवाय जगणं, जगणं 'वाटून' घेणारी लोक
 आजूबाजूला नसणं हे आत्यंतिक वेदनादायक आणि अशक्यप्राय आहे. 

परंतु खरोखर आपल्याला अशी बोलण्याची, वाटून जीवन जगण्याची इतकी गरज का असते? अनेकदा माझे अनेक मित्र केवळ बोलण्यासाठी म्हणून मला बोलावत असतात. मनात लपवून
ठेवलेलं, समाजात वागत असतांना बुरख्याखाली झाकून ठेवलेलं, प्रकाशाच्या भीतीने खोटेपणात, काळोखात दडवून ठेवलेलं भरपूर काही अशा वेळी हे मित्र भरभरून बोलतात. तासनतास असं बोलून झाल्यावर खूप चांगलं वाटलं, असंही म्हणतात. 

खरं तर मी त्यांना चांगलं वाटावं याच्यासाठी त्यांना काही समुपदेशन करतो, सांत्वन करतो असं मुळीच नाही. मी फक्त शांतपणे त्याचं बोलणं ऐकत असतो. तेसुद्धा कुठल्याच मार्गदर्शनाची अपेक्षा न करता, केवळ भरभरून बोलण्यासाठी ते येत असतात. खरं तर समाजात वावरत असतांना कितीतरी लोकांशी आपला संपर्क येत असतो. कितीतरी लोकांशी रोजचं बोलत असतो आपण. मग पुन्हा अशा वेगळ्या बोलण्याची गरज का पडावी? 

याचं मुख्य कारण मला निरीक्षणाअंती जाणवलं ते असं की, समाजात एकमेकांशी बोलणं हे केवळ स्वत:ची प्रतिष्ठा जपण्यासाठी उभारलेला देखावा असतो. या बोलण्यात खरेपणा खूपच कमी असतो. केवळ सामाजिक नियमांची चाकोरी जपण्याकरता केलेली ती एक खटपट असते. 

त्यामुळे मनात खूप खूप आतमध्ये लपवलेला 'स्व', बाहेर येण्याच्या धडपडीत तडफडत असतो. ही तडफड खूप त्रासदायक असते.    
या तडफडीत सगळं आत कोंबून भरलेलं असतं. मात्र जेव्हा हे दाबून ठेवलेलं फुटून बाहेर यायला लागतं, तेव्हा असं स्वत:ला उघडून ठेवणं, सगळं बाहेर ओतून देवून ओझ्यातून मुक्त होणं आवश्यक वाटायला लागतं.

असं बोलणं, रिकामं होणं पुढच्या प्रवासासाठी अतिआवश्यक असतं. म्हणून बोलून टाका, खुलेपणाने जगा...मोकळेपणाने आयुष्यात प्रकाशाला जागा करून द्या...


1 comment: