Sunday, November 13, 2011

दाटलेलं मळभ... 'स्व' मधलं !

सकाळी शांतपणे ध्यानधारणा करण्यासाठी मी जवळच असणाऱ्या नदीच्या किनारी जात असतो. तिथली शांतता,  ध्यानामुळे येणारी स्तब्धता हे सगळंच मोठं विलक्षण आणि सुंदर असतं. अशा वेळी आजूबाजूच्या सगळ्या गोष्टीत आपण स्वत:चं आयुष्य, त्यातले सगळे खाचखळगे शोधायला लागतो.

ध्यान म्हणजे फार काही कठीण वगैरे अजिबात नसतं. शास्त्रीय संगीताचा एक सुंदर नमुना बाजूला ऐकत
आणि डोळे मिटून शांतपणे स्वत:च्या श्वासाकडे बघत राहणं, अशाप्रकारे मी ध्यान करत असतो.

 काही काळ लोटला की असं बसून राहणं खूप सवयीचं आणि आनंददायी होऊन जातं. याने आपल्याच खूप खूप आतल्या दिसायला लागतं. दडवून ठेवलेलं सगळं बाहेर येतं.

पाण्याच्या बाजूला एखादा मोठा वृक्ष उभा असतो. अगदी स्थितप्रज्ञ असा तो शांतपणे उभा असतो. परंतु जेव्हा आपलं प्रतिबिंब बघण्यासाठी म्हणून तो वृक्ष पाण्यात डोकावून बघतो, तेव्हा त्या वाहत्या पाण्यात त्याला स्वत:चं प्रतिबिंब सुद्धा प्रवाही दिसतं. या प्रवाही पाण्यात तो स्वत:ला नीटपाने जोखुच शकत नाही.

मला वाटतं आपल्या सगळ्यांचं या वृक्षासारखं होतं. आयुष्याच्या कितीतरी गोष्टीत आपण इतके अडकून जातो, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचे इतके दाट ढग तयार होतात, की त्यातून स्वत:च्या आतमध्ये डोकावून बघणं कठीण होवून जातं.

परंतु हे असंच चालू देणं खूपच धोकेदायक! कारण आपल्या स्वत:च्या आतमध्ये लक्ष दिलं नाही, तर कधीच स्वच्छ न केलेल्या खोलीसारखं आतमध्ये जाळं वाढायला लागतं...कधीच न काढता येणारं... तेव्हा वेळीच ही स्वच्छता केलेली बरी.

   

No comments:

Post a Comment