ग्रेस हे एक कोडे आहे.उलगडलय असं वाटत असतानाच ग्रेस
चकवून जातो आणि आपण पुन्हा गुरफटलेले असतो.संकुचित परिघात राहून ग्रेस चा अर्थ
लावायला गेलं तर माणूस भूलभूलैयात अडकलाच म्हणून समजा.या ‘संध्यामग्न पुरुषाने’ ‘चंद्र माधवीच्या प्रदेशात’ ‘मृगजळाचे बांधकाम’
करून ठेवलेले आहे त्यामुळे भास,आभास हे निश्चित आहेत.
ग्रेस
कर्करोगावर उपचार घेत असताना दीनानाथ मंगेशकर इस्पितळात त्यांना भेटण्याचा योग
तब्बल ३ वेळा आला.(ग्रेस यांची एकदा भेट होणे हेच कधीकाळी अत्यंत अशक्य अशी गोष्ट
होती).तेव्हा जाणवले की हा माणूस फक्त ‘संध्यामग्न’ नाही तर ‘आत्ममग्न’ देखील आहे.त्यांच्या
खोलीत पं.हृदयनाथ मंगेशकरांचे १-२ फोटो सोडले तर चारही भिंतींवर ग्रेस यांचेच
विविध भाव मुद्रातील फोटो लावलेले होते.ग्रेस यांच्या माणूस घाणेपणाविषयी आणि
विक्षिप्त तेच्या वदन्ते विषयी त्यांच्याच तोंडून ऐकले “ Sir..साहित्याचे
संमेलन या गोष्टीवर माझा विश्वास नाही,त्यामुळे मी तिकडे कधी फिरकलो नाही.मी कुठली
‘प्रतिष्ठानं’ किंवा ‘कट्टे’ काढले नाहीत..आणि खरं सांगू का Sir..I am a
gentleman पण समोरच्या माणसाची बोलताना मला पहिल्या ५ मिनिटात समजतं की या माणसाशी
आपली तार जुळणार की नाही..आणि तार जुळणार नसेल तर तो दोघांच्याही वेळेचा अपव्यय
असतो..म्हणून मी टाळतो अशा लोकांना..आणि त्यातून कोणी पत्ता मागीतलाच तर माझ्या
घरापासूनच्या ४ किलोमीटर इकडचा आणि ४ किलोमीटर तिकडचा असा पत्ता एकत्र करून देतो..”
कर्करोगामुळे
ग्रेस यांचे शरीर कृश झालेले होते..आवाज क्षीण झालेला होता पण स्पष्ट होता आणि
तर्जनी आणि करंगळी च्या मधली २ बोटं अंगठ्या खाली दाबून,डोळे मिटून धीर गंभीर पणे
बोलण्याची पद्धत मात्र तीच होती.एकदा बोलत असताना ग्रेस चा मोबाईल
‘निनादला’.त्यांची रिंगटोन होती ती चर्चबेल च्या नादमय आवाजाची.ग्रेस रंगात आलेले
होते त्यामुळे त्यांनी फोन उचलला नाही..लगेच पुन्हा फोन वाजला.मी त्यांना
“महत्वाचा फोन असेल..घ्या” असे सुचवले तर ग्रेस म्हटले “छे हो महत्वाचा
कसला..माझ्या मुलाचा राघव चा फोन आहे”.न बघताच कसं ओळखलत असं विचारल्यावर ग्रेस
म्हटले “सर..मी पहिल्यांदा फोन घेतला नाही तरी तरी लगेच दुसऱ्यांदा फोन करणारा आणि
मी उचलीन अशी दुर्दम्य पण भाबडी आशा असलेला
या अलम दुनियेत ‘राघव’ शिवाय दुसरा कोणीच नाही..Do you know Sir..which is the
most difficult thing in life?” प्रश्न उत्तराच्या अपेक्षेने केलेला नव्हता म्हणून
मी गप्प बसलो. “To avoid such poor relatives”..नंतर थोड्यावेळ पसरलेल्या शांततेचा भंग करत मी
म्हटलो “ग्रेस..तुम्हाला त्रास होणार नसेल तर ‘राघवची समजूत’ ही कविता म्हणाल ?”
ग्रेस थोडेसे चपापलेले दिसले..किंचीत हसून ग्रेस ने धीरगंभीर आवाजात २ कडवी
म्हटली..
“राघवा..सावलीपाशी कधी थांबू नये रे बाळा
मृगजळी
वाजवी उन..तृष्णेचा घुंगुरवाळा
वाटले
मलाही तेव्हा..आला तर नाही पूर
वाळूला
दचकून पाणी..का सोडून जाते दूर?”
कर्करोगाचे निदान,उपचार याबाबत सुद्धा ग्रेस भरभरून आणि
मिश्किलपणे बोलत. “ हृदयनाथशी फोन वर बोलत होतो तेव्हा त्यांना माझ्या आवाजात फरक
जाणवला,म्हणून तपासणी करायला गेलो तर घशात शबरीच्या बोराएव्हडी गाठ..हृदयनाथ चा
आग्रह की माझा आवाज बदलता कामा नये,म्हणून शस्त्रक्रियेऐवजी प्रकाश किरणांचे उपचार
केले.वाघ म्हटलं तरी खातो आणि वाघोबा म्हटलं तरी खातो.कॅन्सर तो कॅन्सर..घशातला मोठा
आणि पोटातला छोटा अस काही नसतं.माझ्या पेशींशी युद्ध करून विजय मिळवलेला हा divine decease आहे.”
ग्रेस कर्करोगाशी २ वेळा धीरोदात्त पणे लढले आणि ही लढाई
चालू असताना त्यांच्या मधली सृजनशीलता किंचितही कमी झाली नाही.’कावळे उडाले
स्वामी’ आणि ‘ओल्या वेळूची बासरी’ अशी दोन पुस्तके त्यांनी या उपचाराच्या काळात
लिहिलेली आहेत.
ग्रेस यांचा कक्ष प्रथमदर्शनी असल्यामुळे त्यांच्या वर
नर्सेस चे कायम लक्ष असे.त्याबाबत ग्रेस एकदा सांगू लागले “मी असाच उपचार घेऊन
आलो..आणि रात्री ३ वाजता ,प्लेटो,ज्ञानेश्वर म्हणायला लागलो..मी ग्लानीत
गेलोय असे समजून नर्स ची धावपळ सुरु झाली त्यांनी डॉक्टर ला बोलावले..तेव्हा मीच
म्हटलो..सर..जो पर्यंत माझ्या तोडून हा ‘ज्ञानेश्वर.विठ्ठल.कुलकर्णी’ येतोय तो
पर्यंत मी पूर्ण शुद्धीत आहे असं समजा”
ग्रेस यांच्याशी
झालेल्या ३ भेटीनंतर जाणवले की अनेक दंतकथांनी घेरलेला हा माणूस विलक्षण मनस्वी
आहे आणि त्यांच्या विक्षिप्त वागण्यामागेही काही तात्विक कारणे आहेत आणि त्या
वागण्याला माणूसघाणेपणाचे सरसकट लेबल लावता येणार नाही.
मकरंद.गजानन.दीक्षित.
No comments:
Post a Comment