Tuesday, November 29, 2011

खरेपणा आणि दांभिकता...

सध्या सर्वत्र दांभिकता अगदी भरून आहे. खरेपणाने जगणार्यांची संख्या खूपच कमी झाली आहे. प्रत्येकाला आपण कोणीतरी आहोत, हे सिद्ध करायचं असतं. या सिद्ध करण्याच्या धावपळीत जो तो स्वत्व गमावून बसतो आणि उरते ती केवळ दांभिकता!!

या लोकांच्या वागण्यात, बोलण्यात सर्वत्र दांभिकतेचा वास असतो. आम्हाला सगळ्या क्षेत्रातलं सगळं कळतं, असा यांचा समज असतो. सदैव खोट्याचा आधार घेत हे लोक पुढे जात असतात. आपली खरी प्रतिमा लपविण्यासाठी ते आयुष्यभर अतोनात प्रयत्न करतात. या सगळ्या त्यांच्या प्रयत्नाला भरपूर यशदेखील मिळतं. समाजात त्यांना भरपूर मान-सन्मान मिळतो, त्यांच्या दांभिकतेला बळी पडून अनेक लोक त्यांना विद्वान, सच्चे सुद्धा मानतात. समाजाने केलेल्या यशाच्या सगळ्या व्याख्या त्यांना अगदी तंतोतंत लागू पडतात.

मात्र या लोकांना स्वत:च्या आतमध्ये स्वत:चं खरं दुषित रूप ठावूक असतं. हा खोटेपणा त्यांना सदैव खात असतो. आपला बुरखा फाटण्याची त्यांना भीती वाटत असते. या असुरक्षिततेपायीते सदैव बुरखा सांभाळण्यातच त्यांचं आयुष्य जातं, भलेही कितीही भौतिक सुखात ते लोळत असलेत तरी याचं दु:ख मात्र त्यांना असतंच.

असा दांभिकपणा न जमणारे कदाचित भौतिक सुखं नाही मिळवू शकणार, यशाच्या, सन्मानाच्या शिखरावर आरूढ होणं नाही जमणार मात्र खरेखुरे असल्याचा आंतरिक आनंद मात्र त्यांना नक्कीच असतो. आयुष्यात बेचैनी त्यांना कधी हैराण करत नाही. आणि मला दूरदृष्टीने विचार केल्यावर असं वाटतं की आंतरिक शांतता अनुभवण्याचा आनंद हा अशा असुरक्षित आणि अस्थायी सुखापेक्षा कितीतरी महत्वाचा आणि मूल्यवान असतो. 

No comments:

Post a Comment