Thursday, December 1, 2011

देवाचं 'देणं'.

आपल्यापैकी कितीतरी लोक हे देवावर अपार श्रद्धा आणि विश्वास ठेवून असतात. काही लोक उघडपणे तसं सांगत अथवा दाखवत नसले तरी मनातून त्यांची देवावर भक्ती असतेच. कारण आयुष्याच्या एका टप्प्यावर प्रत्येकाला शक्ती आणि उभं रहाण्याचं सामर्थ्य देणारा कोणीतरी हवाच असतो. आणि यासाठी देवाव्यातिरिक्त अन्य सक्षम पर्याय कोणता असेल, नाही का?

मी, किंबहुना आपण सारेच, असे कितीतरी लोक पाहतो, जे कोणत्याही कामाची सुरुवात करतांना कुलदैवत, पावणारी देवता यांच्या पूजेने, नमनाने सुरुवात करतात. परीक्षा चांगली जावी याकरिता देवाला साकडं घालतात. सगळं सुरळीत व्हावं यासाठी देवाची विनवणी करतात. मुलगा, मुलगी व्हावी यासाठी देवाला नवस बोलतात. रस्त्यावरील देवळाला नमन करून प्रवास चांगला होण्यची आन भाकतात.

अशा प्रकारे सदैव देवाकडे काहीतरी मागत राहायची सगळ्यांना अगदी सवय झाली आहे. ही अशी श्रद्धा म्हणजे स्वार्थी आहे, असं मला वाटतं. देव काही खात नाही, हे माहित असल्यानेच तर त्याला एव्हढा नैवद्य दाखवला जातो. नंतर हा नैवद्य देवाचा प्रसाद म्हणून आम्हीच फस्त करतो.

रोजच्या आपल्या दैनंदिन आयुष्यात, आपल्या आसपासची एखादी व्यक्ती जर केवळ स्वत:चा विचार करत असेल, केवळ मला हे हवे, ते हवे अशा पकारे जर वागत असेल तर त्याचा आपल्याला राग येतो. मात्र देवाजवळ वागतांना आपणच अशा स्वार्थी भावनेने वागतो त्याचे काय? देवावर विश्वास असणं, त्याच्या शक्ती-सामर्थ्यावर श्रद्धा ठेवणं यात गैर असे काहीच नाही.

मात्र सदोदित आपली दु:खं आणि सुखं एव्हढ्यापुरताचं देवाचं आपल्या आयुष्यातील स्थान आपण मर्यादित का करून टाकतो? कधीतरी अगदी खऱ्या भक्तीभावाने, मनोभावे , कुठल्याच अपेक्षेविना देवाला स्मरायला काय हरकत आहे? केवळ प्रवास करत असतांना रस्त्यातील मंदिरासमोर हात जोडून प्रवास सुखकर होऊ दे, असा स्वार्थीपणा केव्हापर्यंत?

कधीतरी म्हणून बघा तर खरं देवाला की, बाबा रे, मला काहीच नको...सगळं काही मिळवण्यासाठी हवं असलेलं सारं काही दिलंस की तू मला... शक्ती दिलीस, बुद्धी दिलीस...ते सारं वापरून जगेन मी... आता फक्त एकच अभिलाषा...तुला मिळविण्याची...एकदा तू भेटलास की मग सगळं सगळं काही मिळालं...!!! खरंच, ही अनामिक निस्सीम  दैवभक्ती आणि त्याच्यावरील निस्वार्थ श्रद्धा अनुभवाचं...!!!

No comments:

Post a Comment