Sunday, December 25, 2011

Man is less social animal today.

या लेखाचं शीर्षक मुद्दामच इंग्रजीत दिलं.कारण त्याचा प्रत्यय आणि परिणाम हा इंग्रजीमध्ये अधिक चांगला आणि हवा तसा होतो. अगदीच पूर्वीपासून 'मनुष्य सामाजिक प्राणी आहे' असं आपण ठायीठायी ऐकत, वाचत आणि कदाचित अनुभवत आलोत. पूर्वीच्या काळी खरोखरच समाज एकसंध आणि एकजिनसी होता. समाजामध्ये वावरणं हे त्याकाळी गरजेचे होते. त्यामुळे माणूस समाजशील प्राणी आहे, असं विचारवंतानी म्हटलं आणि त्या काळाच्या हिशोबाने ते बरोबरच म्हणावे लागेल.

परंतु आज केवळ समाजामध्ये राहतो किंबहुना राहावं लागतं म्हणून मनुष्य समाजशील, असं म्हणणं कितपत योग्य होईल? संगणक, फेसबुक, सोशल नेटवर्किंग या सगळ्यामुळे माणूस जवळ आला खरा, मात्र तो केवळ काल्पनिक अर्थात व्हर्चुअल दुनियेत! वास्तविक दुनियेत मात्र कोणाला कोणाशी कामाव्यतिरिक्त बोलायची, आपल्या भावभावना वाटून जगायची आवश्यकताच वाटत नाही.

प्रत्यक्ष वावरताना आपल्या आतमध्ये खूप काही दडवून ठेवणारा माणूस  व्हर्चुअल दुनियेत मात्र सतत व्यक्त होत राहतो. अगदी सकाळी झोपेतून उठल्यापासून झोपेपर्यंत सगळ्याच गोष्टी तो व्यक्त करत असतो. समोरासमोर बोलायला मात्र तो कचरत असतो. मला वाटतं हे मनुष्याच्या दुबळेपणाचं लक्षण आहे. आपली चूकच काय पण आपला आनंद सुद्धा समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालून व्यक्त करायला धाडस लागतं. आणि नेमकं हेच धाडस आपण आज कुठेतरी हरवून बसलोय.

सगळ्या गायकांच्या गाण्याच्या कॅसेट्स उपलब्ध असतात. परंतु तरीदेखील त्यांच्या लाइव्ह कार्यक्रमांना इतकी प्रचंड गर्दी का होत असावी?  कारण कोणत्याही गोष्टीला जेव्हा जिवंत चैतन्याचा स्पर्श होतो तेव्हा त्यातला आनंद, समाधान आणि खरेपणा हा खरोखरीच अनुभवण्यासारखा असतो. म्हणूनच वाटतं की, माणसाने   व्हर्चुअल दुनियेत जरूर व्यक्त व्हावं परंतु समोरासमोर खऱ्याखुऱ्या दुनियेत सुद्धा जगावं...जिवंत असं चैतन्य हरवून बसू नये कारण  त्यातच साऱ्या जीवनाचं सार आहे..!!

No comments:

Post a Comment