'अरुण जाखडे' हे नाव किती लोकांना ठावूक आहे मला माहित नाही. पुस्तकांच्या जगात रमणारी माणसं त्यांचं नाव नक्कीच जाणून असतील. 'पद्मगंधा प्रकाशन' या पुस्तक प्रकाशन संस्थेचे ते प्रमुख.
महाविद्यालयात होणाऱ्या एका स्पर्धेच्या संबंधाने त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली आणि या जगात अजूनही सामाजिक भावना जपणारे आणि निस्वार्थी लोक आहेत या गोष्टीवर विश्वास बसला. स्पर्धा मराठी साहित्य या विषयाशी निगडीत असल्यामुळे आम्ही काही मराठी पुस्तक प्रकाशनांकडे गेलो होतो. बऱ्याच ठिकाणी आम्हाला अगदी चांगले दोन शब्ददेखील न ऐकता बाहेर शब्दश: हाकलण्यात आलं. विशेषत: तत्वज्ञान, नैतिकता अशा विषयांची पुस्तके प्रकाशित करणाऱ्या प्रकाशन संस्थांमध्ये हा अनुभव अधिक आला हे विशेष..!!
दरम्यानच्या काळात 'पद्मगंधा प्रकाशन' संस्थेकडे जाण्याचा योग आला. तेव्हा मुलांचा उपक्रम म्हणून अरुण जाखडे सरांनी तत्काळ मदत करण्याचं मान्य केलं. त्यानंतर बरंच वेळ सरांशी गप्पा मारण्याची संधी मिळाली. तांत्रिक क्षेत्रात सुमारे २० वर्षे काम करत असतांनाच त्यांनी आवड म्हणून प्रकाशन संस्था सुरु केली. आज संस्थेचा विस्तार प्रचंड झाला आहे असंच म्हणावं लागेल. शिवाय जाखडे सर स्वत: उत्तम लेखक असून ते सकाळ इ. वृत्तपत्रांमधून लेखन करत असतात. शिवाय त्यांची स्वलिखित अशी दोन पुस्तकेसुद्धा आहेत. इंग्रजी, हिंदी, मराठी असा वाद न करता जगण्यासाठी निदान एक भाषा लागतेच लागते असं अगदी प्रामाणिक मत जाखडे सर मांडतात.
हा लेख लिहिण्यामागे प्रकाशनाची अथवा एका विशिष्ट व्यक्तीने मदत केली म्हणून त्याची स्तुती करणे असा उद्देश मुळीच नाही. केवळ पद्म्गांधानेच नव्हे तर इतरही अनेकांनी आम्हाला मदत केली आहे. परंतु मदत देतांना कोणत्या भावनेने केली जाते हेसुद्धा महत्वाचे असते. निस्वार्थीपणे मदत करतांना त्यात काहीतरी उपकार आपण समोरच्या व्यक्तीवर करत आहोत असा अविर्भाव त्यात नसावा. बऱ्याचदा मदत करत असतांना भीक देण्याचा अविर्भाव असतो.
खरं तर एखाद्याला मुक्त हस्ताने आणि मुक्त मनाने मदत करायला सुद्धा खूप सामर्थ्य लागतं. आपल्याकडे जे काही आहे त्यापासून स्वत:ला बांधून न ठेवणं ( detachment ) ही खूप महत्वाची आणि आव्हानात्मक गोष्ट आहे. पण आयुष्यात ज्याला ते जमले तो खरोखर सामर्थ्यवान म्हणायला हवा. आणि मला वाटतं 'अरुण जाखडे' यांच्यासारखी माणसं खरंच निधड्या छातीचीचं आहेत. त्यांना आणि त्यांच्यासारख्या सगळ्यांनाच मनापासून सलाम..!!
No comments:
Post a Comment