Sunday, January 15, 2012

उत्तरं मिळणं नव्हे तर प्रश्नच गळून पडणं म्हणजे ज्ञान.

एखादा व्यक्ती ज्ञानी केव्हा समजला जातो? तर जेव्हा त्याला आयुष्यातील  सगळ्या प्रश्नांची उत्तरे माहित असतात तेव्हा तो ज्ञानी अशी सर्वमान्य समजूत आहे. परंतु ज्ञानी माणसाची आणि ज्ञानाची ही व्याख्या  सर्वार्थाने चुकीची आहे. प्रश्नांची उत्तरे मिळवणं म्हणजे ज्ञान मिळवणं ही चुकीची समजूत आहे.

खरं म्हणजे जेव्हा आयुष्यातले  सगळे प्रश्न गळून पडतात, विचारायला म्हणून काहीच उरत नाही, तेव्हा ते खरे ज्ञान असं समजावं. आणि ज्याचे असे आयुष्यातले सगळे प्रश्न गळून पडतात तो खरा ज्ञानी समजावा. केवळ प्रश्न-उत्तरांच्या खेळामध्ये हातात काहीच लागत नाही. उत्तरं मिळाली तरी ती फक्त माहिती म्हणून साठविली जातात.

एक मनुष्य एकदा खूप सारे प्रश्न घेवून तावातावाने बुद्धाकडे गेला. त्याने लागलीच बुद्धाजवळ आपल्या प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. बुद्धाने शांतपणे सगळं ऐकून घेतलं. नंतर बुद्ध त्याला म्हणाला, तू इथे वर्षभर शांतपणे राहा, शांत हो. आणि बरोबर एका वर्षाने तुझे प्रश्न तू मला विचार. तो व्यक्ती उत्तरं मिळविण्याकरिता इतका झपाटलेला होता कि तो वर्षभर तिथे थांबायला तयार झाला. 

वर्षभराने बुद्ध त्याच्याजवळ जावून म्हणाला, "आता तुला काही विचारायचं आहे का?" परंतु त्याचं उत्तर मात्र अचंबित करणारं होतं. तो म्हणाला, " आता विचारण्यासारखं माझ्याजवळ काहीच नाही. जवळचे सगळे प्रश्न गळून पडले आहेत."

मला वाटतं की हेच खरं ज्ञान आहे. वर्षभर शांत राहून, मन:शांती मिळवून त्याचे सगळे प्रश्नच गळून पडलेत. खऱ्या ज्ञानाचं हेच लक्षण असतं. ज्ञानाला कशामागे धावायची इच्छा नसते, कोणती उत्तरं त्याला शोधायची नसतात. कारण मिळालेल्या उत्तरांमधून पुन्हा नव्याने नवीन प्रश्न निर्माण होत असतात. ज्ञान हे असंच शांत, स्तब्ध आणि पुरेपूर भरलेलं असतं.







No comments:

Post a Comment