Sunday, January 15, 2012

मंगेश पाडगावकर- एक सच्चा असामी!

                आयुष्यात काही माणसं अशी भेटतात की आयुष्यभर ती लक्षात राहतात. विशेष म्हणजे जर ही माणसं वलयांकित असतील, प्रसिद्धीच्या झोतातील असतील तर ते आयुष्यावर एक वेगळाच प्रभाव पाडत असतात.

                  नुकताच असाच एक सुंदर अनुभव मला आला. महाविद्यालयाच्या एका कार्यक्रमासाठी मंगेश पाडगावकरांना बोलवायचं ठरलं. माझ्याकडेच सगळी जबाबदारी असल्याने मी स्वत:च त्यांना संपर्क साधला. पाडगावकर म्हणजे साहित्यातील आणि कवितेच्या क्षेत्रातील एक हिमालयाच. एवढ्या मोठ्या व्यक्तीशी बोलतांना एक स्वाभाविक दडपण मनावर असतं.

मात्र आश्चर्य म्हणजे अगदी पहिल्याच फोनवर पाडगावकरांनी येण्याचं मान्य केलं. त्यानंतर एक रात्रभर त्यांच्यासोबत राहण्याचा दुर्मिळ योग आला आणि त्यानिमित्ताने एवढ्या मोठ्या पदावर जावूनदेखील साधेपणा टिकवता येतो याचा प्रत्यय आला.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने कितीतरी वेळ पाडगावकरांच्या सोबत घालवायला मिळाला. मला वाटतं माझ्या आयुष्यातील हे खरंच अगदी अविस्मरणीय क्षण होते. कुसुमाग्रज, पु,ल.देशपांडे, बोरकर अशा कितीतरी लोकांच्या आठवणी त्यांच्या तोंडून ऐकायला मिळाल्यात.

पाडगावकरांच्या स्वभावातला पदोपदी अनुभवायला येणारा गोडवा हासुद्धा खरोखर निराळा आणि विरळाच!
अशी माणसं खरंच खूप काही शिकवून जातात. आणि महत्वाचं म्हणजे एव्हढं मोठं होवूनसुद्धा साधेपणा टिकवता येतो, स्वभावातला गोडवा जपता येतो ही सगळ्यात मोठी शिकवण मिळाली.

पाडगावकरांना, त्यांच्या मोठेपणाला, ८३ व्या वर्षीसुद्धा खणखणीत असणाऱ्या आवाजाला, स्वभावातल्या गोडव्याला, वागण्यातल्या साधेपणाला आणि सहजपणे आपलसं करून टाकणाऱ्या त्यांच्या आपलेपणाला मनस्वी सलाम...!!!






































No comments:

Post a Comment