Saturday, March 31, 2012

प्रेम...प्रेम...आणि प्रेम!!!


'प्रेम' या भावनेविषयी लिहिणं हे खूप कठीण आहे असा माझा अनुभव आहे. ही भावना इतकी विशाल आहे की व्यक्त करायला खरंच खूप कठीण होवून बसतं. प्रेम हे अनुभवायचं असतं, ते व्यक्त करता येणं आवश्यक नसतं. परंतु तरीही आजूबाजूला घडणाऱ्या काही घटना मनाला खूप बोचणाऱ्या असतात. त्यामुळे या विषयावर मी पुन्हा एकदा लिहितो आहे.


तरुण वयात कोणाविषयी आकर्षण, प्रेम वाटणं हे अगदी निसर्गनियमाला अनुसरून आहे. त्यात चुकीचं असही काहीच नाही. अनेक जण या वयात एकमेकांशी लग्न करायचं ठरवतात. आजच्या भाषेत याला 'commit' होणं असं म्हणतात. ही प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाची गोष्ट आहे. एकमेकांसोबत राहणं, सहवास अनुभवणं, काही वेळी संभोगातीत होणं हे खरोखरंच आनंददायक आहे. या कशालाही माझा कोणताच आक्षेप नाही.


मला वाईट एकाचं गोष्टीचं वाटतं, ते म्हणजे खुपदा असं प्रेम करणं, commit होणं ही गोष्ट लोक, तरुण खूप सहजपणे, निष्काळजीपणे घेतात. commit होणं आणि break up होणं या अगदी नेहमीच्या गोष्टी होवून गेल्या आहेत. एखाद्या व्यक्तीवर काही काळ प्रेम करून त्याच्यावरचं प्रेम नंतर नाहीसं कसं होतं, याच गोष्टीचं मला आश्चर्य वाटतं.


काही वेळेपूर्वी एकमेकांसाठी जीव देवू शकणारे अचानक एकमेकांचा तिरस्कार कसे करू शकतात. प्रेम हे काही खुर्चीसारखे नाही की जे एखाद्या ठिकाणाहून उचलून दुसऱ्या ठिकाणी हलवता येते. किंवा पंखा बंद केलं की त्याची हवा येणं जसं बंद होते तसं एखादं बटन बंद करून प्रेम कारण थांबवता नाही येऊ शकत. प्रेमात हेवेदावे, समजून घेणं आणि अशा कितीतरी गोष्टी येतात. त्या काही विशेष कष्ट घेवून कराव्या लागतात असं नाही. त्या आपोआप आतून येत असतात. आणि ज्या कोणाची या सगळ्या गोष्टी करण्याची ताकद नसेल त्याने प्रेम करूच नये. कारण प्रेम ही सामर्थ्यवान लोकांची गोष्ट आहे असं मी मानतो.


प्रेम करण्याची पात्रता येत नाही तोवर प्रेम करू नका आणि प्रेम ही पवित्र भावना कलंकित करू नये एव्हढंच वाटतं

No comments:

Post a Comment