कवी ग्रेस या माणसाविषयी मला शालेय जीवनात फारसे विशेष आकर्षण असं नव्हतं. शाळेत कधीतरी त्यांची एक कविता होती. इतर कवितांप्रमाणेच त्याही कवितेचा मी अभ्यास केला, त्यावरल्या प्रश्नांची उत्तरं लिहून मार्क्स मिळवलेत एव्हढाच काय या माणसाशी माझा संबंध होता.
मात्र जसंजसं वय वाढत गेलं, तशा माझ्या आकलनाच्या कक्षा काही प्रमाणात तरी विस्तारल्यात. साहित्याशी अधिक जवळून संबंध यायला लागला. आणि तेव्हा ग्रेस हे काहीतरी वेगळंच रसायन आहे हे समजायल लागलं. ग्रेस च्या कवितांचा अर्थ मला शाळेत कळला होता असं मला तेव्हा वाटलं होतं. मात्र मी किती अपूर्ण होतो हे नंतर जाणवायला लागला.
ग्रेस च्या संध्याकाळच्या कविता वाचतांना हा माणूस संध्यामग्न माणसाची लक्षणं घेवूनच जन्माला आलाय हे जाणवायला लागलं. अर्थात मला ग्रेस अजून कळला असं मी म्हणणार नाही. मात्र ग्रेसला मी अनुभवायला लागलो एव्हढं मात्र नक्की. सकाळच्या किंवा दुपारच्या जाणीवेच्या प्रांतातला हा कवी नाही एवढं कळलं. याला समजून घ्यायचा असेल तर नेणिवेच्या प्रांतात जावं लागतं हे जाणवलं. ग्रेस च्या कवितांचा अर्थ शोधात बसलो तर आपण चाचपडतो, अडखळतो. या कविता फक्त अनुभवाच्या असतात. त्यांच्या ओलेपानात मनसोक्त भिजायचं असतं.
ग्रेस ची ओल्या वेळूची बासरी ऐकतांना खूप काही हाती गवसल्यासारखं जाणवतं. दरम्यानच्या काळात जडलेलं दारू, गुटखा यांच व्यसन या माणसाने वाटलं तेव्हा सहजपणे झुगारून दिलं. हा स्वत:च्या प्रतिभेचा आणि निष्ठेचा धनी होता, राजा होता. ग्रेस ला लोक गर्विष्ठ म्हणायचेत. मात्र प्रतिभेचा हा धनी स्वत:शी नेहमीच प्रामाणिक होता आणि त्यामुळे त्याने अशा टीकेकडे कधीच लक्ष दिलं नाही.
ग्रेसला एकदा भेटायचा योग आला. महाविद्यालयातील एका कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून बोलवायला मी ग्रेसला भेटण्यासाठी पुण्यातल्या मंगेशकर रुग्णालयात गेलो होतो. कर्करोगामुळे ग्रेस तिथे होते. शरीर अत्यंत थकलेलं दिसत होतं. परंतु चेहऱ्यावर मात्र खरोखरंच तेज झळाळत होतं. अगदी काही मिनीटचं मी तिथे होतो. ग्रेसनी कार्यक्रमास यायला नकार दिला. परंतु त्या नकाराने खिन्नता येण्याऐवजी मला काहीतरी विलक्षण आनंद मिळाला. काहीतरी वेगळ्याच श्ब्दापलीकडच्या अनुभवाने मी भारून गेलो.
ग्रेसचं मला जाणवलेलं आणि भावलेलं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा खरेपणा. आयुष्यभर हा माणूस स्वत:च्या जाणीवा आणि नेणीवा यांच्याशी अगदी प्रामाणिक होता. जग काय म्हणतंय याचा त्याने कधीच विचार केला नाही. प्रसिद्धी ही गोष्ट त्याच्यासाठी मिथ्या होती. त्याच्या या खरेपणाला, प्रामाणिकपणाला, मनस्वीत्वाला, संध्यामग्नत्वाला, ‘देहावरची त्वचा आंधळी, सोलून घ्यावी कोणी’ असं म्हणणाऱ्या त्याच्या प्रतिभेला, ओल्या वेळूच्या बासरीतून निनादात राहणाऱ्या ग्रेस नामक संध्यापर्वाला माझा सलाम.
No comments:
Post a Comment