Saturday, March 24, 2012

देव देव्हाऱ्यात नाही...

आपल्याकडे देव ही संकल्पना पूजण्यापेक्षा चर्चेचीच आहे असं दिसून येतं. कित्येक पिढ्या गेल्यात, कित्येक दशकं आणि शतकं गेलीत, तंत्रज्ञान आलं परंतु देव आहे किंवा नाही ही चर्चा मात्र आजही तितक्याच चवीने चघळली जाते. बहुजन आस्तिक आणि अल्पसंख्य असणारे नास्तिक असा हा संघर्ष असतो.


माझं स्वत:चं देव आहे किंवा नाही याबद्दल असं काही मत नाही. एखाद्या व्यक्तीला मंदिरासमोरून जाताना नमस्कार करावासा वाटत असेल तर त्यात चूक म्हणण्यासारखं काहीच नाही. याउलट एखाद्याला तसं वाटत नसेल तर तेसुद्धा योग्यच.

मुळात देवाबद्दलच्या माझ्या काही संकल्पना या खूप वेगळ्या आहेत. आपण लोक देवाला कोणीतरी व्यक्ती म्हणून मानतो. मात्र माझ्या मते देव म्हणजे व्यक्ती, व्यक्तिमत्त्व नसून देव ही अनुभूती आहे, अस्तित्व आहे. देव म्हणजे एखाद्या अनुभवासमान आहे. अनुभव हा कधी ‘भेटत’ नसतो, तो केवळ अनुभवता येत असतो.

अनुभव हे कित्येक असतात. मग देव हा अनुभव कुठला? तर देव म्हणजे प्रेम, आनंद, अपार करुणा या सगळ्यांची अनुभूती. देव म्हणजे सुखाचा सोहळा...एक ‘स्व’च्या आतमधला उत्सव म्हणजे देव.
मग अशा या प्रेम, आनंद यांच्या अनुभवाची अर्थात देवाची मंदिरे कशी बांधणार? या अनुभवाला कोणते नाव देणार? हा अनुभव खूप खूप superconcious पातळीवर असतो. मग त्याला व्यक्त कसं आणि का करावं? अशा या देवाच्या प्रार्थनेची नव्हे तर त्याच्याविषयीच्या प्रार्थनीय मनाची खरी गरज आहे. ‘देव म्हणजे देवपण’ अशी गुणात्मक ही संकल्पना आहे हे समजून घ्यायला हवे.

देवाला व्यक्तिमत्वाच्या बंधनातून मुक्त करणे खूप गरजेचे आहे. एखाद्याचे व्यक्तिमत्व किंवा प्रतिमा तयार करणे म्हणजे त्याला बांधून टाकण्यासारखे, गुलाम बनविण्यासारखे आहे. कारण जेव्हा एखाद्याची काही प्रतिमा जेव्हा आपण बनवत असतो तेव्हा त्या व्यक्तीने त्या प्रतीमेप्रमाणेच वागावे असं एक प्रकारचं बंधन आपण घालून देत असतो. आणि ती व्यक्ती अशा प्रतिमेनुसार वागली नाही तर त्याच्याविषयी आपल्या मनात कटुता येते. म्हणजे देवाची प्रतिमा तयार करून आपण एक प्रकारे देवालाच गुलाम बनवत असतो.

अशा या देवाला अनुभवण्याचा एकच मार्ग, तो म्हणजे ध्यानाला सुरुवात करून समाधीपर्यंत पोहचणे! आणि या अवस्थेला पोहचल्यानंतर आपोआपच देव ‘कळेल’. देव एक अनुभव आहे आणि त्याला अनुभवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे समाधी...’स्व’च्या आतमधला प्रकाश अनुभवणं...!!! 

No comments:

Post a Comment