Friday, May 18, 2012

मी पासून आपणपर्यंत


प्रवास करणं हा मनुष्यापासून अगदी प्राणिमात्रांपर्यंत सगळ्यांचा स्थायीभाव आहे. आवड म्हणून, गरज म्हणून, एकाचं ठिकाणाचा कंटाळा आला म्हणून किंवा अगदी पर्याय नाही म्हणून प्रत्येकच जण ठराविक कालावधीने प्रवास करत असतो.

अशा या भौतिक प्रवासासोबतच प्रत्येक व्यक्तीचा एक अधिभौतिक पातळीवरचा प्रवास सुरु असतो. काही वेळी असा हा आंतरिक पातळीवरचा प्रवास त्या व्यक्तीला जाणवतो किंवा काही वेळी तो अगदी नकळतसुद्धा होत असतो. प्रत्येकाच्या परीपक्वतेनुसार हा प्रवास आणि त्याची दिशा ठरत असते. आणि हा प्रवास आहे ‘मी पासून आपणपर्यंत’चा!

माणसाची कोणतही काम करण्यामागची प्रेरणा कोणती असते? बहुतांशी वेळी स्वत:ची प्रतिमा सांभाळणं हीचं असते असं म्हंटल तर वावगं ठरू नये.  खरं सांगायचं झालं तर अनेकदा लोकांचा जगण्याचा मूळ आधार हाच मुळी त्यांचे मीपण, त्यांचा खोटा स्वाभिमान हा असतो. अगदी मुलाला चांगल्या शाळेत टाकण्यामागे सुद्धा पुढे मोठेपणी तो आपलं नाव उज्ज्वल करेल ही भावना असते आणि त्यातसुद्धा मीपणाचा वास आहे हे नाकारून चालणार नाही.

अशा या मीपणाला माझा विरोध वगैरे मुळीच नाही. कारण हा प्रवास मुळातच सुरु ‘मी’ पासूनच होतो. प्रत्येकालाच थोड्या प्रमाणात का होईना मात्र ही भावना असतेच असते. आणि त्यात गैर सुद्धा नाही. सामान्य माणूस स्वत:ची झोळी भरल्यानंतरच इतरत्र भिक्षादान करतो. परंतु आयुष्यभर या मीपणाच्या संकुचिततेची जाणीवच न होणं अथवा होऊनदेखील त्याच्या बाहेर पडण्याची हिंमत आणि दानत न होणं हे मात्र भेकडपणाचंच लक्षणं म्हणायला हवं.

आयुष्याच्या निदान एका टप्प्यावर प्रत्येकाला या मीपणाच्या मर्यादितपणाची जाणीव होते. हे मीपण सोडून द्यावं असं वाटायला लागतं. मात्र खरं सांगायचं तर माणसाचं मीपण हे जेव्हा अधिकाधिक उंच होतं तेव्हा तो अधिकाधिक वैश्विक व्हायला लागतो. अशा माणसांना जातीच्या, धर्माच्या आणि एवढंच काय अगदी देशाच्या सुद्धा सीमा संकुचित करू शकत नाही. गांधी, tolstoy, einstein अशी माणसं फक्त भारत, जर्मनी एवढ्याचपुरता कधी मर्यादित राहिलीत का? अशा माणसांच मीपण इतकं विशाल होतं की त्यात आपोआप आपलेपणाची भावना आली. ही माणसं नेहमीच वैश्विक होती. आणि हा आपलेपणा असाच सहजपणे यायला हवा.  

विज्ञानामध्ये उर्जेच्या संबंधाने एक नियम आहे. उर्जा तयार करत येत नाही अथवा नष्टही करता येत नाही. ती फक्त एका अवस्थेमधून दुसऱ्या अवस्थेत परावर्तीत करत येते. प्रत्येकाच्या आतला ‘मी’ हासुद्धा उर्जेचा एक प्रकार आहे. आणि आपल्याला तो एका दुसऱ्या अवस्थेमध्ये म्हणजे ‘आपण’ मध्ये स्थित्यतरित करायचा आहे.

परंतु हे आपलेपण केवळ तथाकथित सामाजिक कामं करायला लागल्याने येत नसतं. कारण या ‘आपण’ शब्दात देखील मोठी गम्मत आहे.

कितीतरी वेळा केवळ माझे मित्र, माझे नातलग, माझे जातीचे लोक यांच्यासाठी काम करणं यातच आपलेपणाची संकल्पना सामावलेली आहे असा गैरसमज होऊ शकतो. परंतु हे मित्र, जातभाई माझे आहेत म्हणून मी त्यांच्यासाठी राबणार यामागे सुद्धा सुप्तपणे एक ‘मी’ दडलेला असतो. त्यामुळे इतरांसाठी जगणं म्हणजे ज्याला कोणाला गरज असेल त्याला खुल्या दिलाने मदत करणं. मग यात तो माझा, माझ्याशी संबंधित अशी भावना असता कामा नये.

‘आपण’ या शब्दात परकेपणा, शत्रुत्व हे सगळं गळून पडतं. अखिल मनुष्यजात, प्राणिजात माझीच अशी संकल्पना त्यात असते. त्यात मीपणाचा वास सुद्धा राहत नाही.

इथे बुद्धाची एक गोष्ट सांगतो. रागाने, अस्वस्थतेने आणि अगतिकतेने त्रासलेला एक राजा एकदा बुद्धाकडे जातो. मला शांती हवी असं सांगतो. बुद्ध त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी चार वाजता यायला सांगतो. फक्त येताना तुझ्या ‘स्व’ ला घेऊन ये असं बजावतो. ‘स्व’ ला घेऊन जाणे म्हणजे काय यावर तो राजा रात्रभर विचार करतो. मात्र त्याला त्याचा अर्थ काही समजत नाही. तो तसाच सकाळी चार वाजता हजर होतो. बुद्ध त्याला विचारतो की तुझा ‘स्व’ कुठे आहे. राजा उत्तरतो की हा स्व म्हणजे काय? बुद्ध त्याला सांगतो की तू डोळे बंद करून हा तुझ्यातला हा स्व शोध. राजा तेव्हा हा स्व शोधू लागतो. कितीतरी तास डोळे बंद करून तो ‘स्व’ ला शोधायचा प्रयत्न करतो. शेवटी बऱ्याच कालावधीने डोळे उघडून तो बुद्धाला सांगतो की माझ्या आतमध्ये मला ‘स्व’ भेटलाच नाही. आतमध्ये फक्त पोकळी आहे, शून्य आहे. आता हा मीच नाही तर वैफल्यता कोणाला येणार? हे मीपण निघून गेलंय, मी आता शांत आहे. मित्रहो अशी ही शांतीची, समाधानाची अत्युच्च पटली म्हणजेच आपलेपणाची भावना.

मला वाटतं की शेवटाकडे वळत असतांना ‘आपण’ या भावनेकडे अधिक विशालतेने पाहायला हवे. ‘अहं ब्रह्मास्मि’, ‘अत्त दीप भाव’ या यामध्ये हे सारं सामावलेलं आहे. अशा या स्वत:मधल्या ब्रह्माची जाणीव होणं म्हणजे खऱ्या अर्थाने मीपण गळून पडणं होय. माझ्या स्वत:मध्येच विश्व सामावलेले आहे ही भावना म्हणजेच आपलेपणाची भावना होय. कारण एकदा याची अनुभूती झाली की मग मात्र कोणत्याही प्रकारचा संकुचित विचार करायला सुद्धा वेळ राहत नाही. मी, मीपण, स्वार्थ, दुराभिमान हे सगळं अगदी अलगद पणे गळून जातं...यात कृत्रिमता उरत नाही. बळजबरीने मिरवलेली उदारता सुद्धा इथे उरत नाही. इथे फक्त ‘ जो जे वांछील, तो ते लाहो’, अशी अत्यंत अपार करुणेची, विशालतेची, उदारपणाची आणि खरेपणाची भावना उरते. आणि मला वाटतं की हा अगदी सहजपणे, नैसर्गिक सहजपणाने होणारा प्रवास म्हणजेच ‘मी पासून आपणपर्यंत’चा प्रवास आहे.

No comments:

Post a Comment