भारतीयच नाही तर सगळ्या जगभरातील मानसं हे अतिअध्यात्माच्या रोगाने पछाडलेली आहेत. देव हा प्रत्येकासाठी नित्यविधी झाला आहे. श्रीराम लागुंसारखी नास्तिक मानसं अगदी बोटावर मोजण्याइतकीच.
आजकालच्या जगात समाजाची कोणतीही गोष्ट 'अती' झाली उदा. अतीप्रेम, अतीश्र्द्धा, अतिआवड, की तिचे व्यवसायात रुपांतर कसे करायचे याचे उत्तम शिक्षण देणाऱ्या IIM, Harward Business School या आणि अशा कित्येक संस्था आहेत. तेव्हा अतिअध्यत्मिक झालेला समाज यांच्या नजरेतून सुटला तरच नवल. त्यामुळे अध्यात्माचा धंदा सध्या अगदी जोरदार चालू झाला आहे. यात आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट एकच, ती म्हणजे याला धंद्याचं स्वरूप आणणारी मंडळी व्यवसायाचं कोणतही विशेष शिक्षण न घेतलेली आहेत.
एखाद्या फारशा मोठ्या नसलेल्या कोपर्यातल्या गावात एखादं मंदिर उभं करायचं. आतमध्ये एखादा देव आणून ठेवायचा. मंदिरात एक भलीमोठ्ठी घंटा लावायची. एक दानपेटी ठेवायची. आणि देव अत्यंत 'कडक' अर्थात नवसाला वगैरे पावणारा आहे असं पंचक्रोशीत सांगत फिरायला म्हणून चार-दोन भाडोत्री मानसं ठेवायची. हे सगळं ज्याला जमलं त्याच्या मंदिरात अतिअध्यत्मिक लोकांची रांग लागलीच म्हणून समजायची.
मग एखादी थातुरमातुर ट्रस्ट काढायची. एखादा मोठ्ठा सेलिब्रेटी मंदिरात डोकं टेकवायला आणून त्याच्याकडून लाखोंचे दागिने मंदिरासाठी घ्यायचेत. म्हणजे मंदिरात येणाऱ्या इतरांनाही मंदिरात देणगी दिल्यावाचून राहवत नाही. अशा प्रकारे अगदी पद्धतशीरपणे तुम्ही स्वत:चं एक मोठ्ठं साम्राज्य उभं करू शकतात. आणि वरून 'देवाचं करणारा माणूस' म्हणून मानही मिळवू शकतात.
आजकाल भारतात हे प्रकार अगदी सर्रास सुरु आहेत. अगदी ते शिर्डी ते बालाजी सर्वत्र दिसून येतात. या मंदिरात भल्यामोठ्ठ्या रांगा असतात. वातावरणात प्रचंड गोंधळ असतो. कुठून कसल्याश्या धुपाचा, कुठून प्रसादाचा वास येत असतो. मंदिराच्या कानाकोपऱ्यात नारळ फोडल्याने अक्षरश: चिकचिक असते. त्यात कितीतरी तास प्रतीक्षा केल्यानंतर एखादा सेकंदभर देवाच्या पायावर मस्तक ठेवायला मिळतं.
अशा ठिकाणी शांती हा प्रकार कुठेच दिसून येत नाही. मन:शांती तर अजूनच दूर. अशा ठिकाणी जावून आल्यावर आता आपण देवाला जावून आलो, तेव्हा देव काही करणार नाही एवढं उथळ आणि खोटं समाधान मात्र नक्कीच मिळतं. मुलाला, मुलीला पुढील शिक्षणासाठी पैसा नाही असं सांगणारे पालक देवाच्या मंदिरात मात्र देणगी देतात, महाप्रसाद देतात. या सगळ्या गोष्टी खरच चीड आणणाऱ्या आहेत.
देवावर श्रद्धा, भक्ती जरूर असावी. मात्र त्यासाठी दरवेळी मंदिरात जाऊन हजारो, लाखो रुपये का उधळावेत. घरच्या देवघरात मनोभावे नमस्कार केलात तरी देवापर्यंत तो नमस्कार पोहचतो. देव सगळीकडे आहे असं म्हणतो ना आपणच. मग मंदिरात जावून कशाला चुराडा करायचा पैशांचा! त्यापेक्षा ते पैसे मुलांच्या शिक्षणाकरिता वापरावेत, आपली आवड-निवड जोपासण्याकरिता वापरावेत आणि हा देवाच्या नावावर सुरु झालेला असभ्य धंदा बंद पडावा असं माझं स्पष्ट आणि प्रामाणिक मत आहे.
No comments:
Post a Comment