Monday, October 1, 2012

पाऊस तुझ्या माझ्या मनातला.... !!!



आजच कॉलेज संपल्यानंतर सगळे मित्र boat club वर नेहमीसारखे बसलो होतो. Boat club म्हणजे आमच्या सगळ्यांची नेहमीची आरामात गप्पा मारत बसण्याची जागा. या ठिकाणी कुठलंच बंधन नसतं...ना वेळेचं, ना विषयाचं. प्रत्येकाची एक नवी ओळख इथे होते. नवे विषय कळतात. या विषयांची व्याप्ती अफाट असते. ते अगदी सुईपासून ते अवकाशापर्यंत कोणत्याही विषयावर असतात.

तर असाच आज इथे बसलो असतांना अचानक सारीकडे भारून आलं. वातावारण अत्यंत गार आणि धुंद, मुग्ध झालं. मुसळधार पाऊस पडणार याची ही सूचना होती. या अशा वातावरणामध्ये माझं मन आत्यंतिक आनंदाने मोहरून जातं. पाऊस म्हणजे निसर्गाचं अत्यंत नाजूक, सुंदरतेने परिपूर्ण भरून आलेलं रूप. मनुष्य आणि पाऊस यांच्यात अगदी पूर्वीपासून काहीतरी दृढ नातं असावं अशी माझी ठाम समजूत आहे.

पाऊस आला की सगळा निसर्ग खऱ्या अर्थाने पूर्ण झाला असं वाटतं. नव्या दमाने निसर्ग फुलून आला असं जाणवतं. आणि निसर्गच नाही तर मनसुद्धा अगदी तरुण होतं या पावसात. पावसाला जीवन असं नाव कदाचित याचमुळे दिलं असावं.

असा हा पाऊस सुरु झाला. आणि सगळीकडे पळापळ सुरु झाली. मी मात्र निसर्गाचा हा सहजसुंदर अविष्कार पाहण्यात गढून गेलो होतो. सगळेच एका छताखाली जाऊन बसले. नंतर मीसुद्धा त्यांच्यात जाऊन बसलो. आणि गप्पा सुरु झाल्या पावसावर. मी अर्थातच मला पाऊस किती मनापासून आवडतो ते सांगितल. परंतु आमच्यातल्या कित्येकांना पावसाबद्दल अक्षरश: घृणा आहे कळल्यावर मला आश्चर्याचा धक्का बसलाच पण त्या साऱ्यांची कीव आली. पावसात आपण ओले होतो, म्हणून पाऊस न आवडणं हे कारण अत्यंत अरसिक आणि भोगवादी वृत्तीचं प्रतिक वाटतं.

मनुष्य निसर्गाच्या खूप खूप दूर जातोय. केवळ माणसापासूनच माणूस दुरावला असं नाही तर अगदी निसर्गापासूनसुद्धा तो दूर जातोय ही खेदाची आणि तितक्याच धोक्याची गोष्ट आहे. ज्या पावसामुळे आपलं सगळ जीवनचक्र चालूये तो पाऊस येऊ नये असं म्हणणं म्हणजे स्वत:ची वैचारिक दिवाळखोरी सार्वजनिक करणं असच मी म्हणेन.

प्रत्येकाची आवड-निवड ही वेगळी असते आणि ती असावीच. मात्र जगण्याची जी अत्यंत मुलभूतता आहे, अस्तित्वाचा जो मूलाधार आहे त्या निसर्गाला मात्र आपण मुळीच नाकारू नये आणि नेहमीच त्या अतिविशाल, अफाट अशा निसर्गाच्या छायेखाली राहावे एवढंच वाटतं.  


No comments:

Post a Comment