Thursday, October 18, 2012

Give me some sunshine...


Physics मध्ये एक नियम आहे. Every particle tends to come to its original state to attain stability. त्यानुसार निसर्गातील प्रत्येक वस्तू, प्रत्येक कण हा त्याच्या मुळच्या अवस्थेकडे येण्याकरता प्रयत्न करत असतो. बाह्य प्रभावामुळे समजा एखादी वस्तू मुळच्या अवस्थेपेक्षा इतरत्र गेली तर तिचा समतोल बिघडतो आणि पुन्हा मूळ अवस्थेकडे परतण्यासाठी धडपडते.

आणि माणसालासुद्धा हा सिद्धांत अगदी तंतोतंत लागू पडतो. बाहेर, आजूबाजूला घडत असणाऱ्या अनेक गोष्टीत माणूस अडकून जातो. त्यांच्यासोबत तो वाहत जातो. आणि त्यामुळे त्याच्या मूळ अशा गाभ्यापासून, मूळ पिंडापासून तो दूर जातो. आणि अशा नवीन अवस्थेमध्ये नव्याचे नऊ दिवस संपलेत की अस्वस्थ वाटायला लागतं. याचं कारण म्हणजे ती अवस्था म्हणजे माणसाची मूळ, खरी अवस्था नसते. तो त्याच मूळ पिंड नसतो.

आजूबाजूच्या समाजाच्या बंधनांमुळे, चालीरीतींमुळे माणूस एका विशिष्ट साच्यामध्ये अडकून जातो. त्याला एकाच पद्धतीने वागायला प्रवृत्त केलं जातं. अनेकदा ही समाजाची पद्धत अनेकांच्या पचनी पडत नाही. हे समाजाचे नियम त्यांना जाचक वाटायला लागतात. केवळ आजवर चालत आलं आणि समाजात रहायचं म्हणून या सगळ्या गोष्टी, नियम ते पाळायला लागतात.

जेव्हा जेव्हा समाज, धर्म, जात असा एक विशिष्ट समुदाय असतो तेव्हा तेव्हा तिथे असंख्य नियम, बंधनं आपोआप येतात. आणि अशा समूहाच्या smooth working साठी ते नक्कीच गरजेचं आहे. परंतु यामुळे जर व्यक्तीच्या व्यक्तित्वाला आणि त्याच्या जीवनाच्या मूळ instict ला जर धक्का लागतं असेल तर यावर काहीतरी मार्ग काढायला हवा असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण अशा विशिष्ट साच्यामध्ये, mould मध्ये जर आपण माणसांची व्यक्तिमत्वचं भरडून टाकायला लागलो तर हे निसर्गाच्या प्रवाहाविरुद्ध आहे.

प्रत्येकाचा जगण्याचा एक मार्ग असतो. आणि तो फक्त फुलवत न्यायचा, त्याला पोषक असं वातावरण निर्माण करायचं एवढाचं कोणत्याही समूहाचा उद्देश असावा. बंधनं घालून फक्त तलाव, डबकी तयार होतात. मुक्तपणे खेळणारी, आनंदाने स्वत:चा मार्ग हुडकून अंतिम अशा सागरापर्यंत जाऊन मिळणाऱ्या नदीला स्वातंत्र्य आणि स्वच्छंदीपणा लागतो हे आपण साऱ्यांनी समजून घ्यायची वेळ आली आहे.  





No comments:

Post a Comment