“मी महाकवी दुःखाचा,प्राचीन नदीपरी खोल
हलकेच होते
दगडाचे,माझ्या हाती
फुल “
‘दुःखाचा सुखी कवी’ असे स्वतःचे वरीलप्रमाणे सार्थ वर्णन
करणाऱ्या कवी ग्रेस यांचे माणिक गोडघाटेरूपी शरीर अनंतात विलीन झाले त्याला येत्या
२६ मार्च रोजी एक वर्ष पूर्ण होईल.वयाच्या २७ व्या वर्षी इ.स. १९६७ मध्ये ग्रेस
यांचा ‘संध्याकाळच्या
कविता’ हा कविता
संग्रह प्रकाशित झाला.तिथपासून ते ‘ओल्या वेळूची बासरी’ या २०१२
साली(मृत्यूच्या २ महिने आधी ) प्रसिद्ध झालेल्या शेवटच्या ललित लेखसंग्रहापर्यंत
म्हणजेच सुमारे अर्धशतक भर ग्रेस यांनी आपल्या विशिष्ट शैलीने,आशयाच्या वैविध्यतेने आणि गुढरम्यतेने
मराठी साहित्य आणि रसिक यांना कधी भारावून,कधी हेलावून तर कधी भांबावून टाकलेले आहे.
ग्रेस यांच्या पद्य आणि गद्य पुस्तकांची
संख्या पाहिल्यास ती १२ इतकी आहे पण content च्या अंगाने विचार केल्यास त्यातील
समृद्धतेला तोड नाही. त्यातही ७ पुस्तके ही ललित लेखानात्मक
गद्य स्वरुपाची आहेत हे लक्षात घेतले पाहिजे.त्यांच्या ‘वाऱ्याने हलते रान’ या ललित लेख संग्रहाला ‘साहित्य अकादमी’ मिळाला. साहित्य अकादमी
ने ग्रेस यांच्या मधील ताकदीच्या आणि सृजनशील सिद्धहस्त लेखकावर उशिरा का होईना पण
अधिमान्यतेची मोहोर उठविली आहे.खुद्द ग्रेस यांना हा प्रश्न विचारला असता ग्रेस
म्हटले “ Sir..I am not a poet,I am not a
writer ! I am an artist and that too an ancient artist “
मराठी,हिंदी,उर्दू आणि इंग्रजी वर प्रभुत्व असणाऱ्या
आणि आपल्या बोलण्यात इंग्रजीचा मुक्त वापर असलेल्या ग्रेस नी व्यक्त होण्यासाठी
मात्र मराठी भाषेची निवड केली आणि मराठी साहित्य समृद्ध केले.ग्रेस यांच्या
लिखाणाचा अनुवाद करण्याचा फारसा प्रयत्न झालेला नाही..आणि झालाच तर त्यांच्या
शब्दांचा अनुवाद करता येईल पण आशयाचा अनुवाद करता येणार नाही.ग्रेस यांनी इंग्रजी
भाषेत लिखाण केले असते तर आज ते जागतिक स्तरावरील प्रख्यात साहित्यिक म्हणून गणले
गेले असते.ग्रेस यांचे गद्य आणि पद्य असे दोन्ही लिखाण वाचल्यास हा एक थोर
विचारवंत आणि तत्वज्ञ होता या निष्कर्षा पर्यंत आपण येऊन पोहोचतो.
-मकरंद.गजानन.दीक्षित.
No comments:
Post a Comment