Wednesday, March 27, 2013

साजणवेळेचा निर्मिक : ग्रेस - २


‘संध्याकाळच्या कविता’ नी ग्रेस ची नोंद घेतली गेली,’राजपुत्र आणि डार्लिंग’ ने विचार प्रवृत्त केले आणि ‘चंद्र माधवीचे प्रदेश’ ने त्यातील आक्रंदन शैली आणि प्रस्थापित वाटांना छेद देणाऱ्या कवितांनी विलक्षण अस्वस्थता निर्माण केली आणि खळबळ उडवून दिली.ग्रेस यांच्या ज्या कवितेचे पहिल्यांदा गाणे झाले ती कविता म्हणजे ‘चंद्रमाधवीचे प्रदेश’ मधली ‘आई:१” ही कविता.
   “ती गेली तेव्हा रिमझिम पाउस निनादत होता
    मेघांत मिसळली किरणे हा सूर्य सोडवीत होता..
   ती आई होती म्हणुनी घन व्याकुळ मीही रडलो
   त्या वेळी वारा सावध पाचोळा उडवीत होता “

या कवितेनी काही मुलभूत प्रश्न निर्माण केले.तोपर्यंत ‘आई’ वर ज्या कविता झाल्या होत्या त्या केवळ आई शी निगडीत असलेल्या माया,वात्सल्य ग्रेस यांच्या भाषेत दिव्यत्व,मांगल्य आणि पावित्र्य यांच्या अनुषंगाने.पण ग्रेस यांनी या कवितेतून आई च्या शरीरजाणिवांचा,स्त्रीतत्वाचा निर्देश केलेला आहे आणि ती आई झाली म्हणून तिच्यातले ‘मादीपण’ संपत नाही हे सूचित केलेले आहे.ग्रेस यांचे म्हणणे असे की मादी हे आई चे आदिम स्वरूप आहे आणि ही  ‘मादी’ उत्क्रांत होत होत तिची ‘आई’ बनते.पण तेव्हा तिच्या शरीरजाणीवा नष्ट होतात असे समजणे भाबडे पणाचे आहे.वरील कडव्यातील ‘ती आई होती म्हणुनी’ चा अर्थ ‘ती आई नसती तर..’ असा आहे.

या कवितेने ग्रेस ला लोकप्रियता मिळवून दिली आणि त्या बाबत उलट सुलट चर्चा देखील झालेली आहे.या कवितेचा समग्र आशय असा आहे की आपल्या शरीर जाणीवा जागृत झालेली (कदाचित विधवा) आई,त्या जाणिवांचा आविष्कार करायला निघाली आहे पण आपल्या मुलाला बालसुलभ भाषेत ती ते समजावू शकत नाही म्हणून ती त्याला टाळून चालली आहे.पण त्या मुलाला पुसटशी का होईना पण त्याची जाणीव होते,बालपण संपलं नाही पण ते संपायची वेळ आली आहे हे उमजते (ग्रेस यांच्या भाषेत ‘गमते’ ) .ते ग्रेस यांनी खलील प्रमाणे मांडले आहे
             “अंगणात गमले मजला संपले बालपण माझे
              खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता”

या कवितेच्या मांडणी मुळे किंवा पं.हृदयनाथ मंगेशकरांच्या आर्त स्वरांमुळे असेल,यातील आई निवर्तली आहे असा आभास निर्माण होतो.पण ते तसे नाही.गाण्यात नसलेल्या पण मूळ कवितेत असलेल्या शेवटल्या कडव्यात आई परत येते.ते कडवे असे आहे
            “हे रक्त वाढतानाही मज आता गहिवर नाही
            वस्त्रात द्रौपदीच्या ही..तो कृष्ण नागडा होता..”
यातील द्रौपदी आणि कृष्ण या प्रतिमा आहेत आणि त्या स्त्री आणि पुरुष असे सुचन करतात.यातून ग्रेस असे सुचवतात की ती आई परत आली आहे पण त्या मुलाला तिच्या बद्दल द्वेष वाटत नाही उलट आई-मुलाच्या नात्या प्रमाणेच स्त्री-पुरुष असा एक अनुबंध त्यांच्यात निर्माण होतो.

लेखक असो किंवा कवी,त्याने ‘अनुभवाची अलिप्तता’ जपली पाहिजे असे म्हणतात.हे एका मर्यादे पर्यंत योग्य असले तरी हे मान्य केले पाहिजे की लेखक किंवा कवी हा काही टाईपरायटर नसतो तो एक हाडामासाचा जिवंत माणूस असतो त्यामुळे विशुद्ध ‘अनुभवाची अलिप्तता’ साध्य करता येत नाही.ग्रेस यांच्या बाबतीत देखील हे लागू होते.स्वतः ग्रेस,त्यांचे बालपण,त्यांची आई याविषयी गुढतेचे वलय निर्माण झालेले आहे..ग्रेस यांनी कधी ते तोडायचा प्रयत्न केला नाही..उलट
            “आई माझी मत्त वासना..संभोगाची भूल
             क्रूर पशूच्या डोळ्यांमधल्या..करुणेचेही फुल
            त्या नंतरही आई निघते..कळशी घेऊन दूर
             तेव्हा कळतो खुळ्या नदीला..या मादीचा सूर”
अशा ‘सांजभयाच्या साजणी’ मधल्या कवितेला ‘ग्रेसची आई’ असे नाव देऊन ते गुढतेचे वलय अधिक गडद आणि मिट्ट काळोखी करून ठेवले आहे.
                                                                                                                             -मकरंद.गजानन.दीक्षित.


No comments:

Post a Comment