Showing posts with label श्रद्धा. Show all posts
Showing posts with label श्रद्धा. Show all posts

Saturday, April 14, 2012

देवाचा धंदा

भारतीयच नाही तर सगळ्या जगभरातील मानसं हे अतिअध्यात्माच्या रोगाने पछाडलेली आहेत. देव हा प्रत्येकासाठी नित्यविधी झाला आहे. श्रीराम लागुंसारखी नास्तिक मानसं अगदी बोटावर मोजण्याइतकीच

आजकालच्या जगात समाजाची कोणतीही गोष्ट 'अती' झाली उदा. अतीप्रेमअतीश्र्द्धा, अतिआवडकी तिचे व्यवसायात रुपांतर कसे करायचे याचे उत्तम शिक्षण देणाऱ्या IIM, Harward Business School या आणि अशा कित्येक संस्था आहेत. तेव्हा अतिअध्यत्मिक झालेला समाज यांच्या नजरेतून सुटला तरच नवल. त्यामुळे अध्यात्माचा धंदा सध्या अगदी जोरदार चालू झाला आहे. यात आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट एकच, ती म्हणजे याला धंद्याचं स्वरूप आणणारी मंडळी व्यवसायाचं कोणतही विशेष शिक्षण  घेतलेली आहेत


एखाद्या फारशा मोठ्या नसलेल्या कोपर्यातल्या गावात एखादं मंदिर उभं करायचं. आतमध्ये एखादा देव आणून ठेवायचा. मंदिरात एक भलीमोठ्ठी घंटा लावायची. एक दानपेटी ठेवायची. आणि देव अत्यंत 'कडक' अर्थात नवसाला वगैरे पावणारा आहे असं पंचक्रोशीत सांगत फिरायला म्हणून चार-दोन भाडोत्री मानसं ठेवायची. हे सगळं ज्याला जमलं त्याच्या मंदिरात अतिअध्यत्मिक लोकांची रांग लागलीच म्हणून समजायची

मग एखादी थातुरमातुर ट्रस्ट काढायची. एखादा मोठ्ठा सेलिब्रेटी मंदिरात डोकं टेकवायला आणून त्याच्याकडून  लाखोंचे दागिने मंदिरासाठी घ्यायचेत. म्हणजे मंदिरात येणाऱ्या इतरांनाही मंदिरात देणगी दिल्यावाचून राहवत नाही. अशा प्रकारे अगदी पद्धतशीरपणे तुम्ही स्वत:चं एक मोठ्ठं साम्राज्य उभं करू शकतात. आणि वरून 'देवाचं करणारा माणूस' म्हणून मानही मिळवू शकतात

आजकाल भारतात हे प्रकार अगदी सर्रास सुरु आहेत. अगदी ते शिर्डी ते बालाजी सर्वत्र दिसून येतात. या मंदिरात भल्यामोठ्ठ्या रांगा असतात. वातावरणात प्रचंड गोंधळ असतो. कुठून कसल्याश्या धुपाचा, कुठून प्रसादाचा वास येत असतो. मंदिराच्या कानाकोपऱ्यात नारळ फोडल्याने अक्षरश: चिकचिक असते. त्यात कितीतरी तास प्रतीक्षा केल्यानंतर एखादा सेकंदभर देवाच्या पायावर मस्तक ठेवायला मिळतं

अशा ठिकाणी शांती हा प्रकार कुठेच दिसून येत नाही. मन:शांती तर अजूनच दूर. अशा ठिकाणी जावून आल्यावर आता आपण देवाला जावून आलो, तेव्हा देव काही करणार नाही एवढं उथळ आणि खोटं समाधान मात्र नक्कीच मिळतं. मुलाला, मुलीला पुढील शिक्षणासाठी पैसा नाही असं सांगणारे पालक देवाच्या मंदिरात मात्र देणगी देतातमहाप्रसाद देतात. या सगळ्या गोष्टी खरच चीड आणणाऱ्या आहेत

देवावर श्रद्धा, भक्ती जरूर असावी. मात्र त्यासाठी दरवेळी मंदिरात जाऊन हजारो, लाखो रुपये का उधळावेतघरच्या देवघरात मनोभावे नमस्कार केलात तरी देवापर्यंत तो नमस्कार पोहचतो. देव सगळीकडे आहे असं म्हणतो ना आपणच. मग मंदिरात जावून  कशाला चुराडा करायचा पैशांचा! त्यापेक्षा ते पैसे मुलांच्या शिक्षणाकरिता वापरावेत, आपली आवड-निवड जोपासण्याकरिता वापरावेत आणि हा देवाच्या नावावर सुरु झालेला असभ्य धंदा बंद पडावा असं माझं स्पष्ट आणि प्रामाणिक मत आहे


Saturday, March 24, 2012

देव देव्हाऱ्यात नाही...

आपल्याकडे देव ही संकल्पना पूजण्यापेक्षा चर्चेचीच आहे असं दिसून येतं. कित्येक पिढ्या गेल्यात, कित्येक दशकं आणि शतकं गेलीत, तंत्रज्ञान आलं परंतु देव आहे किंवा नाही ही चर्चा मात्र आजही तितक्याच चवीने चघळली जाते. बहुजन आस्तिक आणि अल्पसंख्य असणारे नास्तिक असा हा संघर्ष असतो.


माझं स्वत:चं देव आहे किंवा नाही याबद्दल असं काही मत नाही. एखाद्या व्यक्तीला मंदिरासमोरून जाताना नमस्कार करावासा वाटत असेल तर त्यात चूक म्हणण्यासारखं काहीच नाही. याउलट एखाद्याला तसं वाटत नसेल तर तेसुद्धा योग्यच.

मुळात देवाबद्दलच्या माझ्या काही संकल्पना या खूप वेगळ्या आहेत. आपण लोक देवाला कोणीतरी व्यक्ती म्हणून मानतो. मात्र माझ्या मते देव म्हणजे व्यक्ती, व्यक्तिमत्त्व नसून देव ही अनुभूती आहे, अस्तित्व आहे. देव म्हणजे एखाद्या अनुभवासमान आहे. अनुभव हा कधी ‘भेटत’ नसतो, तो केवळ अनुभवता येत असतो.

अनुभव हे कित्येक असतात. मग देव हा अनुभव कुठला? तर देव म्हणजे प्रेम, आनंद, अपार करुणा या सगळ्यांची अनुभूती. देव म्हणजे सुखाचा सोहळा...एक ‘स्व’च्या आतमधला उत्सव म्हणजे देव.
मग अशा या प्रेम, आनंद यांच्या अनुभवाची अर्थात देवाची मंदिरे कशी बांधणार? या अनुभवाला कोणते नाव देणार? हा अनुभव खूप खूप superconcious पातळीवर असतो. मग त्याला व्यक्त कसं आणि का करावं? अशा या देवाच्या प्रार्थनेची नव्हे तर त्याच्याविषयीच्या प्रार्थनीय मनाची खरी गरज आहे. ‘देव म्हणजे देवपण’ अशी गुणात्मक ही संकल्पना आहे हे समजून घ्यायला हवे.

देवाला व्यक्तिमत्वाच्या बंधनातून मुक्त करणे खूप गरजेचे आहे. एखाद्याचे व्यक्तिमत्व किंवा प्रतिमा तयार करणे म्हणजे त्याला बांधून टाकण्यासारखे, गुलाम बनविण्यासारखे आहे. कारण जेव्हा एखाद्याची काही प्रतिमा जेव्हा आपण बनवत असतो तेव्हा त्या व्यक्तीने त्या प्रतीमेप्रमाणेच वागावे असं एक प्रकारचं बंधन आपण घालून देत असतो. आणि ती व्यक्ती अशा प्रतिमेनुसार वागली नाही तर त्याच्याविषयी आपल्या मनात कटुता येते. म्हणजे देवाची प्रतिमा तयार करून आपण एक प्रकारे देवालाच गुलाम बनवत असतो.

अशा या देवाला अनुभवण्याचा एकच मार्ग, तो म्हणजे ध्यानाला सुरुवात करून समाधीपर्यंत पोहचणे! आणि या अवस्थेला पोहचल्यानंतर आपोआपच देव ‘कळेल’. देव एक अनुभव आहे आणि त्याला अनुभवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे समाधी...’स्व’च्या आतमधला प्रकाश अनुभवणं...!!! 

Thursday, December 1, 2011

देवाचं 'देणं'.

आपल्यापैकी कितीतरी लोक हे देवावर अपार श्रद्धा आणि विश्वास ठेवून असतात. काही लोक उघडपणे तसं सांगत अथवा दाखवत नसले तरी मनातून त्यांची देवावर भक्ती असतेच. कारण आयुष्याच्या एका टप्प्यावर प्रत्येकाला शक्ती आणि उभं रहाण्याचं सामर्थ्य देणारा कोणीतरी हवाच असतो. आणि यासाठी देवाव्यातिरिक्त अन्य सक्षम पर्याय कोणता असेल, नाही का?

मी, किंबहुना आपण सारेच, असे कितीतरी लोक पाहतो, जे कोणत्याही कामाची सुरुवात करतांना कुलदैवत, पावणारी देवता यांच्या पूजेने, नमनाने सुरुवात करतात. परीक्षा चांगली जावी याकरिता देवाला साकडं घालतात. सगळं सुरळीत व्हावं यासाठी देवाची विनवणी करतात. मुलगा, मुलगी व्हावी यासाठी देवाला नवस बोलतात. रस्त्यावरील देवळाला नमन करून प्रवास चांगला होण्यची आन भाकतात.

अशा प्रकारे सदैव देवाकडे काहीतरी मागत राहायची सगळ्यांना अगदी सवय झाली आहे. ही अशी श्रद्धा म्हणजे स्वार्थी आहे, असं मला वाटतं. देव काही खात नाही, हे माहित असल्यानेच तर त्याला एव्हढा नैवद्य दाखवला जातो. नंतर हा नैवद्य देवाचा प्रसाद म्हणून आम्हीच फस्त करतो.

रोजच्या आपल्या दैनंदिन आयुष्यात, आपल्या आसपासची एखादी व्यक्ती जर केवळ स्वत:चा विचार करत असेल, केवळ मला हे हवे, ते हवे अशा पकारे जर वागत असेल तर त्याचा आपल्याला राग येतो. मात्र देवाजवळ वागतांना आपणच अशा स्वार्थी भावनेने वागतो त्याचे काय? देवावर विश्वास असणं, त्याच्या शक्ती-सामर्थ्यावर श्रद्धा ठेवणं यात गैर असे काहीच नाही.

मात्र सदोदित आपली दु:खं आणि सुखं एव्हढ्यापुरताचं देवाचं आपल्या आयुष्यातील स्थान आपण मर्यादित का करून टाकतो? कधीतरी अगदी खऱ्या भक्तीभावाने, मनोभावे , कुठल्याच अपेक्षेविना देवाला स्मरायला काय हरकत आहे? केवळ प्रवास करत असतांना रस्त्यातील मंदिरासमोर हात जोडून प्रवास सुखकर होऊ दे, असा स्वार्थीपणा केव्हापर्यंत?

कधीतरी म्हणून बघा तर खरं देवाला की, बाबा रे, मला काहीच नको...सगळं काही मिळवण्यासाठी हवं असलेलं सारं काही दिलंस की तू मला... शक्ती दिलीस, बुद्धी दिलीस...ते सारं वापरून जगेन मी... आता फक्त एकच अभिलाषा...तुला मिळविण्याची...एकदा तू भेटलास की मग सगळं सगळं काही मिळालं...!!! खरंच, ही अनामिक निस्सीम  दैवभक्ती आणि त्याच्यावरील निस्वार्थ श्रद्धा अनुभवाचं...!!!